भाजप कार्यकर्त्यांचा 'युती तोडा'चा नारा!:संभाजीनगरमध्ये भाजप-सेना युतीची घोषणा होताच राडा, मंत्री अतुल सावेंची गाडी अडवली




छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘कीज हॉटेल’ येथे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून, या बैठकीनंतर महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी महानगरपालिका निवडणुकीत तब्बल 12 बैठका होऊनही शेवटच्या क्षणी युती तुटली होती, ज्यामध्ये भाजपने मोठे यश मिळवले होते मात्र शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नव्हते. आता पुन्हा एकदा दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असला, तरी या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत असून, मागील कटू अनुभवांच्या पार्श्वभूमीवर या नव्या युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप नेते व मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर आणि शिवसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाठ, खासदार संदिपान भुमरे, आमदार रमेश बोरणारे, आमदार संजना जाधव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. मात्र या निर्णयामुळे वैजापूरमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. युतीला कडाडून विरोध करत या कार्यकर्त्यांनी ‘युती तोडा’ अशी मागणी लावून धरली आणि थेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली. जिल्ह्याच्या राजकारणात वरिष्ठ पातळीवर युती निश्चित झाली असली, तरी स्थानिक कार्यकर्त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. भाजप नेते अतुल सावे आणि शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीची अधिकृत घोषणा केली. या जागावाटपानुसार भाजपला 27 तर शिवसेनेला 25 जागा मिळाल्या आहेत. मात्र, ही जागावाटपाची चर्चा अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत जागांच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्याने संजय शिरसाट संतापून बाहेर आले होते, परंतु शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संदीपान भुमरे यांनी त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा चर्चेसाठी प्रवृत्त केल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, युतीची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घालत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. दोन्ही पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक गट अधिक जागांसाठी आग्रही होता. कार्यकर्त्यांच्या मते, हा निर्णय त्यांच्यावर लादण्यात आला असून त्यांनी या युतीला तीव्र विरोध दर्शवला आहे. नेत्यांनी जरी एकीचा संदेश दिला असला, तरी कार्यकर्त्यांमधील हा असंतोष आणि जागावाटपावरून झालेला वाद आगामी काळात महायुतीसमोर मोठे आव्हान उभे करू शकतो. युती म्हटले की, कुठेतरी मागेपुढे होते- संदीपान भूमरे दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भाजपचे सगळे प्रमुख नेते होते. त्याचा काही विषय नाही. आमची फक्त एकच जागा म्हणजे बिडकीनची गेलेली आहे. आमचा प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. पण युती म्हटले की, कुठेतरी मागेपुढे होते. कार्यकर्त्याची इच्छा असते. युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आहे, अशी प्रतिक्रिया भुमरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *