ओबीसी चेहऱ्यांना दूर ठेवल्याने राष्ट्रवादीची माती झाली:अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आता लोकांचा राहिला नाही, लक्ष्मण हाकेंचा घणाघात




पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना जबर फटका बसला. राष्ट्रवादीच्या या पराभवाचे वेगवेगळे राजकीय अन्वयार्थ लावले जात असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी चेहऱ्यांना दूर ठेवल्यामुळे राष्ट्रवादीची माती झाल्याचा दावा केला आहे. महापालिका निवडणुकीत ओबीसी नेत्यांना दूर ठेवल्यामुळे राष्ट्रवादीचा पराभव झाला. तुम्ही 60 टक्के ओबीसींना वेड्यात काढायचे महापाप करत असाल तर तुम्हाला भोपाळाच मिळणार, असे ते म्हणालेत. पुणे व पिंपरी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी युती केली होती. आपली राजकीय तत्त्वे बाजूला सारून हे दोन्ही पक्ष याठिकाणी एकत्र आले होते. पण त्यानंतरही या दोन्ही महापालिका भाजपने आपल्या खिशात घातल्या. राष्ट्रवादीच्या या हाराकिरीची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली असताना लक्ष्मण हाके यांनी बीडच्या शिरूर तालुक्यात आयोजित एका कार्यक्रमात उपरोक्त दावा केला आहे. ते म्हणाले, अजित पवारांची राष्ट्रवादी आता लोकांची राष्ट्रवादी राहिली नाही. हा पक्ष छगन भुजबळांच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकांना सामोरा गेला. त्यामु्ळे त्याची माती झाली. ओबीसींना वेड्यात काढण्याचे महापाप धनंजय मुंडेंसह अनेक ओबीसी चेहरे रणांगणात नव्हते. ओबीसीची माणसेच रणांगणात नव्हती. 60 टक्के ओबीसींना वेड्यात काढायचे महापाप करत असाल तर तुमच्या हाती भोपळाच येणार. या निवडणुकीत तुतारी नामक पक्षाला 22 नगरपालिकांत साधा भोपळाही फोडता आला नाही. हे कशाचे द्योतक आहे. भुजबळ साहेब असते, तर त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेतल्या असत्या. तुम्ही पुरोगामी आहात, तर भूमिका घ्या, असे हाके म्हणाले. सध्या निवडक ओबीसी नेतेच उरलेत ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील इतर मागासवर्गीयांवर अन्याय होत आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव जागांवर मूळ ओबीसी उमेदवारांनाच तिकीट देण्याची गरज आहे. राज्य शासनाने 2 सप्टेंबर रोजी काढलेला शासकीय अध्यादेश आम्हाला अजिबात मान्य नाही. त्यामुळे ओबीसी राजकारण संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावगाड्यात आजही ओबीसी समाज दुय्यम क्रमांकावर आहे. या निवडणुकीत ओबीसी समाजाने आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले नाही, तर शिक्षण व नोकऱ्यांतही ओबीसींवर अन्याय होत राहील. सध्याच्या राजकारणात सध्या निवडक ओबीसी नेतेच उरले आहेत. त्यामुळे ओबीसींनी आपली राजकीय ताकद दाखवली नाही तर त्यांना हक्काची राजकीय पदेही मिळणार नाहीत, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *