खैरेवाडी रस्त्यासाठी २६ ला मुंबई महामार्गावर आंदोलन:रस्ता मंजूर होऊन एक वर्ष‎उलटले तरी काम नाही‎




प्रतिनिधी | घोटी इगतपुरी तालुक्यातील अनेक आदिवासी वाडी-पाडे आजही मूलभूत सुविधा व नागरी हक्कांपासून वंचित आहेत. रस्त्याअभावी नागरिकांचे जीव जात असतानाही शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या एल्गार कष्टकरी संघटनेने २६ जानेवारी २०२६ रोजी मुंबई–नाशिक महामार्गावरील घाटनदेवी मंदिर येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. चिंचलेखैरे ग्रामपंचायत हद्दीतील खैरेवाडी या वस्तीवर जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे येथील नागरिकांना आरोग्य, शिक्षण व गरजांसाठी प्रचंड हाल सहन करावे लागत आहे. पावसाळ्यात नदी ओलांडून शहरात यावे लागते, विद्यार्थी जीव धोक्यात घालून शाळेत जातात, तर आजारी व्यक्तींना व गरोदर महिलांना डोलीतून तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतर चालत न्यावे लागते. काही दिवसांत रस्त्याअभावी दोन दुर्दैवी मृत्यू घडले आहेत. प्रथम जुनवणे वाडी येथील गरोदर महिलेला वेळेवर रुग्णालयात पोहोचता न आल्याने रस्त्यातच प्राण गमवावे लागले. खैरेवाडी येथील एका वृद्ध व्यक्तीचा रस्त्याअभावी वेळेत उपचारा न मिळाल्याने मृत्यू झाला. या दोन्ही घटनांना शासन जबाबदार असल्याचा आरोप एल्गार कष्टकरी संघटनेने केला आहे. खैरेवाडी येथे रस्ता मंजूर होऊन एक वर्ष उलटले असून भूमिपूजनही करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. याबाबत संघटनेने वारंवार निवेदने, अर्ज, मोर्चे व आंदोलने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *