![]()
येरवडा भागात एका डॉक्टरला कोयता दाखवून ५० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. अमोल जीवराज पिल्ले (वय ४६, रा. जयजवाननगर, येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी पिल्ले याच्याविरुद्ध येरवडा, लक्ष्मीनगर, बंडगार्डन तसेच कर्नाटकातील यादगीर पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार, दहशत माजविणे आणि शस्त्र बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे एकूण ५८ गुन्हे दाखल आहेत. ८ जून रोजी सायंकाळी पिल्ले हा डॉक्टरच्या जयजवाननगर येथील रुग्णालयात कोयता घेऊन घुसला. त्याने डॉक्टरकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने कोयता उगारून दवाखान्यासमोर दहशत माजवली. या घटनेनंतर घाबरलेल्या डॉक्टरने तात्काळ लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. घटनेनंतर आरोपी पिल्ले तेथून पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. तो येरवडा भागात थांबल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी राहुल परदेशी आणि अक्षय शिंदे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले आणि त्याच्याकडून कोयता जप्त केला. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत आणि सहायक आयुक्त सुनील जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, गुन्हे शाखेचे निरीक्षक उमेश गित्ते, सहायक निरीक्षक निखील पवार, सहायक निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, पोलीस कर्मचारी यशवंत खंदारे, श्रीनाथ कांबळे, अतुल जाधव, भीमराव कांबळे, सूरज ओंबासे, कादिर शेख यांनी ही कारवाई यशस्वी केली. हेही वाचा.. पुण्यात घायवळ गँग पुन्हा सक्रिय?:सिमकार्ड गुन्ह्यातील फिर्यादी अमित शिंदेवर कोयत्याने वार, थरार सीसीटीव्हीत कैद पुण्यातील कोथरूड परिसरात मंगळवारी सायंकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ याच्या विरोधातील एका गुन्ह्यातील फिर्यादी अमित शिंदे या तरुणावर 8 ते 10 जणांच्या टोळक्याने भररस्त्यात कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अमित गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, या हल्ल्यामुळे पुण्यात नीलेश घायवळची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. सविस्तर वाचा
डॉक्टरला कोयता दाखवून 50 हजारांची खंडणी:58 गुन्ह्यांतील सराईत आरोपी अटकेत
