[ads1]
![]()
पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील पिके वाळून गेली असून, शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी व्याळा गावातील एका शेतकऱ्याने आपली व्यथा सांगताना भावनिक होत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील व्याळा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना समाधान सुरकर यांनी आपल्या शेतीची परिस्थिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. सुरकर यांची कान्हेरी गवळी गावात सुमारे पाच एकर शेती आहे. यामध्ये त्यांनी सोयाबीन आणि तूर पिकाची लागवड केली होती. मात्र, अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिकांची अवस्था सांगताना सुरकर भावुक झाले. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, त्यांच्या मनात आत्महत्येचा विचारही आला होता, असे त्यांनी सांगितले. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाल्यानंतर हा विचार मनातून दूर झाल्याचे त्यांनी सांगितले. हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. शेतकऱ्याची ही अवस्था पाहून उपस्थित वातावरणही काही काळ भावूक झाले. सुरकर यांची व्यथा ऐकल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना धीर दिला. संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी दिला. तसेच शेतातील पिकांची पाहणी करून नुकसान आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती घेतली. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाअभावी खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात अकोल्यासह विदर्भातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. पिकांची सद्यस्थिती, पावसाची कमतरता आणि शेतीवरील खर्च याबाबत शेतकऱ्यांनी आपापल्या अडचणी मांडल्या. शिंदे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुष्काळग्रस्त भागांचा दौरा सुरू केला आहे. मुख्यमंत्री मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तर उपमुख्यमंत्री शिंदे विदर्भातील भागात पाहणी करत आहेत. त्यामुळे राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यावर सरकारचा भर असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी समाधान सुरकर यांच्या डोळ्यात आलेले अश्रू आणि त्यांनी व्यक्त केलेली व्यथा यामुळे दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या संकटाची तीव्रता पुन्हा एकदा समोर आली आहे. हेही वाचा..
फडणवीस दुष्काळी दौऱ्यावर:लातूरमध्ये 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ! पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांकडून सरसकट मदतीचे आश्वासन राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आज लातूर जिल्ह्यातल्या जाऊ गावात पोहचलेत. आता रब्बीसाठी शक्य ती मदत करू, बळीराजासाठी सर्व काही करू, सगळ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडताना शेतकऱ्यांना अक्षरशः रडू कोसळले. सविस्तर वाचा…
[ads2]
‘तुम्हाला भेटल्यानंतर आत्महत्येचा विचार दूर झाला’:एकनाथ शिंदेंसोबत बोलताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
















Leave a Reply