भगवान चवलेंनी माउंट धौलागिरी केले सर:जगातील सातवे उंच शिखर पादाक्रांत, अनेक अष्टहजारी शिखरेही समिट

0
1b47214a-3849-4f59-9125-bd7a7cc21c47_1776598162769.jpg




पुण्यातील गिर्यारोहक भगवान चवले यांनी जगातील सातवे सर्वात उंच शिखर माउंट धौलागिरी यशस्वीरित्या सर केले आहे. १८ एप्रिल २०२४ रोजी त्यांनी हे शिखर पादाक्रांत केले. मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या लव्हार्डे येथील रहिवासी असलेले चवले हे एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. धौलागिरी हे ८,१६७ मीटर (२६,७९५ फूट) उंचीचे शिखर पश्चिम-मध्य नेपाळमध्ये स्थित आहे. ‘धवल’ (पांढरा) आणि ‘गिरी’ (पर्वत) या संस्कृत शब्दांवरून याचे नाव ‘पांढरा पर्वत’ असे पडले आहे. काली गंडकी नदीच्या जगातील सर्वात खोल दऱ्यांपैकी एक असलेल्या खोऱ्याच्या पश्चिमेस हे शिखर आहे. याची १५ हजार फूट उंचीची दक्षिणेकडील भिंत चढाईसाठी अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. यापूर्वी, भगवान चवले यांनी १७ मे २०१८ रोजी सकाळी ६:३० वाजता जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले होते. एव्हरेस्ट सर करण्यापूर्वी त्यांनी चार वर्षे कठोर प्रशिक्षण घेतले होते. २०१७ मध्ये खराब हवामानामुळे त्यांना शिखर माथ्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावरून परत फिरावे लागले होते, मात्र २०१८ मध्ये त्यांनी पुन्हा प्रयत्न करून यश मिळवले. एव्हरेस्टपूर्वी त्यांनी सह्याद्रीतील खडापारसी, वजीर, ड्युक्स नोज, लिंगाणा, तैलबैल, ढाकभैरी यांसारखी कठीण शिखरे आणि हिमालयातील स्टोक कांगरी, घोलप कांगरी, भागीरथी, आयलंड पीक सर केली आहेत. एव्हरेस्टनंतर त्यांनी जगातील पाचवे सर्वात उंच शिखर माउंट मकालू देखील पादाक्रांत केले आहे. माउंट धौलागिरीच्या यशस्वी चढाईसह, भगवान चवले यांनी नेपाळमधील सर्व सात अष्टहजारी (८,००० मीटरपेक्षा उंच) शिखरे सर करण्याचा विक्रम केला आहे. यामध्ये माउंट एव्हरेस्ट, माउंट कांचनजंगा, माउंट मकालू, माउंट ल्होत्से, माउंट मनास्लु, माउंट अन्नपूर्णा १ आणि आता माउंट धौलागिरी यांचा समावेश आहे. असे करणारे ते कदाचित देशातील पाचवे गिर्यारोहक ठरले आहेत. धौलागिरी शिखराचा शोध १८०८ मध्ये लागला, तेव्हा काही काळ त्याला जगातील सर्वात उंच पर्वत मानले जात होते. १३ मे १९६० रोजी स्विस-ऑस्ट्रियन पथकाने (मॅक्स आयसेलिन यांच्या नेतृत्वाखाली) पहिल्यांदा हे शिखर सर केले. महाराष्ट्रातील प्रसाद जोशी, केवल कक्का आणि जितेंद्र गवारे यांनी यापूर्वी धौलागिरी सर केले आहे. या मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील अजून २ गिर्यारोहकांनी हे शिखर सर केले पीआय शिवाजी ननावरे व एसपीआय द्वारका ढोके या दोघांनीही या शिखराला यशस्वी गवसणी घातली. हे दोघेही पोलिस प्रशासनातील अधिकारी आहेत. यामुळे महाराष्ट्र पोलिससाठी सुध्दा गौरवाची बाब आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Notifications OK No thanks