एमआयएम पक्षाची मान्यता रद्द करा, ओवैसींना देशाबाहेर हाकला: नवनीत राणा संतापल्या; म्हणाल्या- पाकिस्तानमध्ये जाऊन दहा नाही, तर वीस मुलं जन्माला घाला – Mumbai News

देशातील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना भाजप नेत्या नवनीत राणा आणि एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यातील वादाने नवे वळण घेतले आहे. काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी एका मौलानाच्या वक्तव्याचा संदर्भ देत हिंदूंना उद्देशून केलेले आवाहन मोठ्या प्

.

नवनीत राणांच्या या वक्तव्यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी अमरावतीतील जाहीर सभेत जोरदार पलटवार केला. त्यांनी उपरोधिक शैलीत नवनीत राणांना डिवचत, तुम्ही चार नाही, तर आठ मुलं जन्माला घाला, आम्हाला त्याचं काहीही देणंघेणं नाही, असे म्हटले. मात्र, ओवैसी यांचा रोख केवळ विधानावर नव्हता, तर त्या मागील राजकीय हेतूंवर होता. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे देशातील लोकांचे लक्ष महागाई, बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवरून हटवले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. द्वेषाचे राजकारण करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला.

ओवैसींच्या या टीकेनंतर आता नवनीत राणा यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी थेट असदुद्दीन ओवैसी यांच्या राष्ट्रनिष्ठेवर आणि घटनात्मक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. डेमोक्रेसी बदलत चालली आहे, यावर ओवैसींनी बोलले पाहिजे. या देशात राहायचे असेल, तर संविधान मानावे लागते, असे म्हणत त्यांनी ओवैसींवर गंभीर आरोप केले. केवळ वक्तव्यापुरते न थांबता, त्यांनी ओवैसींचे नागरिकत्व रद्द करून त्यांना पाकिस्तानला पाठवावे, अशी थेट मागणी करत वादाला अधिक धार दिली.

नवनीत राणा यांनी आपल्या वक्तव्यात ओवैसींवर अनेक मुद्द्यांवरून हल्ला चढवला. पाकिस्तानमध्ये जाऊन दहा नाही, तर वीस मुलं जन्माला घाला, असे म्हणत त्यांनी टोला लगावला. ओवैसींच्या मनात काय विचार चालले आहेत, हे आम्हाला माहिती आहे, असा दावाही त्यांनी केला. तुम्ही संसद सदस्य आहात, डेमोक्रेसीवर बोला. पण तुम्ही संविधानाला मानत नाही, भारत माता की जय म्हणत नाही, वंदे मातरम बोलत नाही, असे म्हणत त्यांनी ओवैसींच्या देशप्रेमावरच प्रश्न उपस्थित केला. मग तुम्ही या देशाला काय मानता? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

इतक्यावर न थांबता नवनीत राणा यांनी निवडणूक यंत्रणेलाही या वादात ओढले. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एमआयएम पक्षाची मान्यता रद्द करावी आणि ओवैसींना देशाबाहेर हाकलावे, अशी मागणी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, हा वाद आता केवळ शब्दयुद्ध न राहता घटनात्मक आणि कायदेशीर मुद्द्यांपर्यंत पोहोचताना दिसत आहे. नवनीत राणा यांच्या या आक्रमक भूमिकेने भाजपच्या कठोर राष्ट्रवादी भूमिकेचे प्रतिबिंब असल्याचे समर्थक सांगत आहेत, तर विरोधक याला ध्रुवीकरणाचे राजकारण म्हणत टीका करत आहेत.

दरम्यान, ओवैसी यांनी अमरावतीतील सभेत केलेल्या वक्तव्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख मोहन भागवत यांच्या लोकसंख्याविषयक वक्तव्याचा उल्लेख करत, एकीकडे मोहन भागवत म्हणतात मुलं जन्माला घाला, तर दुसरीकडे नवनीत राणा चार मुलांचा सल्ला देतात, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी उपहासाने तुम्ही आठ मुलं जन्माला घाला, असे म्हणत हा मुद्दा वैयक्तिक नसून राजकीय द्वेषातून उभा राहतो आहे, असा आरोप केला.

वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता

या घडामोडींमुळे आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांच्या वक्तव्यावर ओवैसी पुढे काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा वाद येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, लोकसंख्या, धर्म, राष्ट्रवाद आणि संविधान या मुद्द्यांवरून राजकीय संघर्ष अधिक धारदार होताना दिसत आहे. या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत सामान्य जनतेचे प्रश्न पुन्हा एकदा बाजूला पडणार का, हा खरा प्रश्न राजकीय निरीक्षक उपस्थित करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *