[ads1]
![]()
सूर्यमालेतील सर्वात दूरचा ग्रह नेपच्यून शनिवार, 26 सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या अगदी जवळ येणार आहे. या दिवशी तो सूर्याच्या अगदी समोर (प्रतियुती स्थितीत) असेल. प्रतियुतीच्या या काळात पृथ्वीपासून नेपच्यूनचे अंतर कमी होईल, ज्यामुळे खगोलप्रेमींना दुर्बिणीच्या मदतीने त्याचे चांगले निरीक्षण करण्याची संधी मिळेल. मराठी विज्ञान परिषदेच्या अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने आणि खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी ही माहिती दिली. मराठी विज्ञान परिषदेनुसार, नेपच्यूनला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी तब्बल 165 वर्षे लागतात. तो स्वतःभोवतीची एक फेरी 16 तासांत पूर्ण करतो. जर्मन शास्त्रज्ञ गॅले आणि लव्हेरिया यांनी 14 सप्टेंबर 1846 रोजी या ग्रहाचा शोध लावला होता. नेपच्यूनच्या वातावरणात मिथेन वायूचे प्रमाण असल्याने तो फिकट निळ्या रंगाचा दिसतो. या ग्रहाचा व्यास 48,600 किलोमीटर असून, पृष्ठभागाचे तापमान उणे 214 अंश सेल्सिअस इतके आहे. नेपच्यूनला एकूण 13 चंद्र (उपग्रह) आहेत. सूर्यापासून नेपच्यूनचे अंतर 4,520 कोटी किलोमीटर (30.1 खगोलीय एकक) आहे. 24 ऑगस्ट 1989 रोजी ‘व्हॉयेजर-2’ हे मानवरहित यान या ग्रहाच्या जवळून गेले होते. खगोल अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे की, या खगोलीय घटनेचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. 26 सप्टेंबर रोजी हा ग्रह सायंकाळी पूर्व दिशेला उगवेल आणि पहाटे पश्चिम दिशेला मावळेल. त्यामुळे तो रात्रभर आकाशात दिसेल. हा ग्रह साध्या डोळ्यांनी दिसत नाही, त्यामुळे त्याच्या निरीक्षणासाठी शक्तिशाली दुर्बिणीची गरज लागेल. हा ग्रह 21 सप्टेंबर 2025 रोजी पुन्हा पृथ्वीच्या जवळ येईल.
[ads2]
नेपच्यून ग्रह 26 सप्टेंबरला पृथ्वीच्या जवळ येणार:खगोलप्रेमींसाठी निरीक्षणाची खास पर्वणी, दुर्बिणीने पाहता येणार
















Leave a Reply