इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअपसाठी AIC Pinnacle आणि NATRAX मध्ये करार:नवकल्पनांना गती देण्यासाठी सामंजस्य करार, चाचणी व उद्योगांशी संपर्क मिळेल

[ads1]


इलेक्ट्रिक वाहने, ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान आणि कनेक्टेड मोबिलिटी क्षेत्रातील नवकल्पना आणि स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी ‘एआयसी पिनॅकल एंटरप्रेन्युअरशिप फोरम’ आणि ‘नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक्स’ (नॅट्रॅक्स) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. १६ सप्टेंबर २०२६ रोजी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कराराचा मुख्य उद्देश स्टार्टअप इनक्युबेशन, तांत्रिक मार्गदर्शन, चाचणी आणि प्रमाणीकरण सुविधा उपलब्ध करून देणे आहे. तसेच, उद्योग क्षेत्राशी संपर्क साधण्यासाठीही सहकार्य मिळेल. यामुळे ऑटोमोटिव्ह चाचणी सुविधा आणि उद्योगांशी स्टार्टअपचा संपर्क अधिक मजबूत होईल, ज्यामुळे पुढील पिढीतील मोबिलिटी तंत्रज्ञानाला चालना मिळेल. चाकण येथील ‘पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स-इका’च्या प्रकल्पात या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. ‘एआयसी पिनॅकल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश ठाकूर आणि ‘नॅट्रॅक्स’चे संचालक डॉ. मनीष जैस्वाल यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी ‘इका-पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स’चे मुख्य उत्पादन अधिकारी झोएब अल्ताफहुसेन करमपूरवाला, संशोधन व विकास विभागाचे मुख्य अभियंते कौस्तुभ जोशी आणि पंकज मुनोळी, तसेच स्वप्नील तांबे उपस्थित होते. ‘एआयसी पिनॅकल’कडून वरिष्ठ व्यवस्थापक शादाब हुसेन, तर ‘नॅट्रॅक्स’कडून वरिष्ठ अभियंता आणि समूह प्रमुख तुलिका मजुमदार उपस्थित होत्या. ‘एआयसी पिनॅकल’कडे स्टार्टअप इनक्युबेशन, मार्गदर्शन आणि उद्योगांशी संपर्काचे मोठे जाळे आहे. तर ‘नॅट्रॅक्स’कडे अत्याधुनिक वाहन चाचणी आणि प्रमाणीकरणाची सुविधा आहे. या भागीदारीतून स्टार्टअप इनक्युबेशन, कौशल्य विकास कार्यक्रम, हॅकाथॉन, नवकल्पना स्पर्धा, तांत्रिक सत्रे, मार्गदर्शन कार्यक्रम आणि उद्योगांशी संवाद असे विविध उपक्रम आयोजित केले जातील. इलेक्ट्रिक वाहने आणि ऑटोमोटिव्ह मोबिलिटी क्षेत्रातील स्टार्टअपना तांत्रिक तज्ज्ञ, उद्योगांचे नेटवर्क आणि चाचणी सुविधांचा लाभ मिळवून देण्यावर विशेष भर दिला जाईल. डॉ. अविनाश ठाकूर म्हणाले, “‘नॅट्रॅक्स’सोबतची ही भागीदारी स्टार्टअप आणि ऑटोमोटिव्ह चाचणी व प्रमाणीकरण क्षेत्रात महत्त्वाचा दुवा ठरेल. इनक्युबेशनच्या पुढे जाऊन नवकल्पनांना तांत्रिक, औद्योगिक आणि चाचणी संबंधित मदत देणे, तसेच बाजारपेठेसाठी तयार उत्पादने विकसित करण्यास प्रोत्साहन देणे, हा आमचा उद्देश आहे.” ते पुढे म्हणाले, “इलेक्ट्रिक आणि कनेक्टेड मोबिलिटी क्षेत्रात या सहकार्यामुळे अनेक उपयुक्त उपक्रम राबवता येतील. स्टार्टअपना उद्योग, धोरणात्मक भागीदार, शैक्षणिक संस्था, सरकारी यंत्रणा आणि इतर संबंधित संस्थांशी जोडण्याचाही प्रयत्न केला जाईल. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि देशातील ऑटोमोटिव्ह नवकल्पना परिसंस्थेशी स्टार्टअपचे संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल.”

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *