![]()
आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. काही जागांवर महायुती एकत्र लढणार आहे, तर काही जागांवर स्वबळावर लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार
.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला हे एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. परंतु, नजीब मुल्ला यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जितेंद्र आव्हाड हे आमचे दुश्मन नाहीत, आम्हाला जर कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवू आणि त्यावर विचार करू, असे मोठे वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केले आहे. त्यामुळे ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत- नजीब मुल्ला
नजीब मुल्ला म्हणाले, जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत. 30 तारखेपर्यंत जर आम्हाला कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवणार आणि त्यावर विचार करणार. शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणायचे आहे. ठाणे शहरात जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी आता विचार करावा, असे सूचक विधान जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी केले आहे. दरम्यान, बुधवारी महाविकास आघाडीची बैठक ठाण्यात पार पडली. मात्र, जागा वाटप अजून जाहीर झालेली नाही.
अजित पवार गटाचे नजीब मुल्ला आणि शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे कट्टर विरोधक मानले जातात. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महायुतीमधून निवडणूक लढवली होती. आता त्या ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे.
महाविकास आघाडी – मनसे एकत्र
दरम्यान, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. माजी खासदार राजन विचारे, जितेंद्र आव्हाड, मनसेचे अविनाश जाधव आणि कॉंग्रेसचे विक्रांत चव्हाण यांच्यात बैठक झाली आहे. मात्र, जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप गुलदस्त्यात आहे.
