अमरावतीत कोरडा दुष्काळ जाहीर करा:शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची नुकसानभरपाई द्या, किसान सभेचे धरणे

[ads1]


अमरावती जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी किसान सभेने बुधवारी, 16 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुरुवातीला उगवणक्षमता नसल्यानेही सोयाबीन उत्पादकांना फटका बसला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे राज्य सरचिटणीस अशोक सोनारकर, जिल्हाध्यक्ष सतीश चौधरी, जिल्हा सचिव प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे आणि प्रकल्पग्रस्तांचे नेते प्रा. साहेबराव विधळे यांनी केले. अशोक सोनारकर यांच्या म्हणण्यानुसार, अमरावती जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांमध्ये 40 ते 60 टक्के पावसाची तूट आहे. सरासरीच्या 75 टक्केपेक्षाही कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता काहीही मिळणे शक्य नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांना जगवण्यासाठी त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन पाठवण्यात आले. या निवेदनात अनेक मागण्यांचा समावेश होता. त्यात जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करणे, तातडीची नुकसान भरपाई आणि पीक विमा देणे, पिकांच्या नुकसानाचे पंचनामे व सर्वेक्षण करून प्रतिहेक्टर 50 हजार रुपये नुकसान भरपाई देणे यांचा समावेश आहे. तसेच, कर्जमाफीचा पूर्ण लाभ देऊन सर्व प्रकारची कर्जवसुली थांबवणे, सर्व शेतकऱ्यांना विनाअट नवीन पीक कर्ज देणे, शेतमजुरांना प्रतिकुटुंब 25 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देणे, शेतकरी-शेतमजुरांच्या कुटुंबातील किमान एका व्यक्तीला नोकरी देणे या मागण्याही करण्यात आल्या. पिण्याचे व सिंचनाचे पाणी, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त, विजेचा प्रश्न आणि अन्नसुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर नियोजन करण्याची मागणीही निवेदनात होती. या आंदोलनात सुशील ढोले, प्रकाश सोनोने, लक्ष्मणराव धाकडे, मनोहर वाढोनकर, किसन लांजेवार, सुधीर बारबुदे, पवन भाकरे, शेतमजूर युनियनचे सुनील घटाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय मंगळे, अनिकेत खुळे, जितेंद्र कोरडे, चंद्रकांत वडसकर, अ. भा. नौजवान सभेचे राज्य सचिव सागर दुर्योधन, जयेंद्र भोगे, राहुल मंगळे, राम जोशी, राजेंद्र दुबे, विष्णु कुऱ्हाडे, संजय सुने, संजय मंगळे, प्रकाश कुऱ्हेकर, आशिष बेहरे, प्रकाश नवले, सूरज आवचार, हरिदास राजगिरे, विनोदराव जोशी, राजाभाऊ बाभुळकर, संजय मंडवधरे, अनिकेत तायडे यांच्यासह विविध तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *