आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा उल्लेख असूनही आरोपी यादीत नाव नाही ‘कायद्यापेक्षा ओळखी मोठ्या ठरतात का?’ – नांदेडमध्ये गंभीर प्रश्न

आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा उल्लेख असूनही आरोपी यादीत नाव नाही

‘कायद्यापेक्षा ओळखी मोठ्या ठरतात का?’ – नांदेडमध्ये गंभीर प्रश्न

नवीन नांदेड | प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा कायद्याच्या अंमलबजावणीबाबत गंभीर शंका निर्माण झाली असून, कायद्यापेक्षा ‘ओळखी’ मोठ्या ठरतात का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते जीवन आबाजीराव घोगरे पाटील यांच्या अपहरण, दोन तास गाडीत फिरवून अमानुष मारहाण आणि नंतर उपचार करून सोडून देण्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादीनुसार, २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सिडको येथील बडोदा बँकेसमोरून जात असताना जीवन घोगरे पाटील यांच्या वाहनासमोर अचानक एक चारचाकी गाडी आडवी लावण्यात आली. त्यातून उतरलेल्या व्यक्तींनी वाहनाच्या काचेवर दगड मारला. भीतीपोटी चालक घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर, घोगरे पाटील यांना बळजबरीने गाडीत कोंबून डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली.

यानंतर जवळपास दोन तास त्यांना गाडीत फिरवत बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. डोळ्यांवर पट्टी असल्याने आपण कुठे नेले जात होतो किंवा कोणाशी संपर्क झाला, याची कोणतीही माहिती मिळू शकली नसल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

विशेष म्हणजे, या मारहाणीच्या वेळी “साहेबांच्या नादी लागू नको” असे शब्द वारंवार ऐकू आल्याचा गंभीर दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ क्षणिक नसून पूर्वनियोजित दबावतंत्राचा भाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनेप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत एकूण सात जणांची नावे आरोपी म्हणून नमूद आहेत –

शुभम सुनेवाड (वसरणी), राहुल दासरवाड (मालेगाव, ता. वसमत), कौस्तुभ रणवीर (पूर्णा), मोहम्मद अफरोज (गिरगाव, ता. वसमत), देवानंद भोळे (नांदुसा, ता. नांदेड), माधव वाघमारे आणि विवेक सूर्यवंशी (गणेशनगर).

मात्र, याच फिर्यादीत पुढे एक अत्यंत महत्त्वाचे वाक्य नमूद आहे की –

“प्रताप पाटील चिखलीकर, प्रवीण पाटील चिखलीकर व मोहन हंबर्डे यांनी वरील आरोपींना मारहाण करण्यास लावले.”

असे थेट आरोप असतानाही ही नावे आरोपी यादीत का नाहीत? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

विशेष बाब म्हणजे, याच व्यक्तींविरोधात यापूर्वी दाखल असलेल्या तत्सम प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र सादर झाले होते. मात्र, तेव्हाही आमदार आणि त्यांच्या पुत्रांची नावे वगळण्यात आली होती. त्यामुळे “आमचं काही होत नाही” या समजुतीतूनच असे प्रकार घडत आहेत का, अशी शंका व्यक्त होत आहे.

पोलीस प्रशासनाने रात्री ९ वाजेपर्यंत बडोदा बँक परिसरातील तसेच इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून हालचाली केल्याचे दाखवले, मात्र फिर्यादीतील शब्दांची निवडच अनेक अर्थ सूचित करणारी असल्याचे जाणकारांचे मत आहे. संपूर्ण फिर्यादीत “जीवघेणा हल्ला” आणि “कट” हे शब्द टाळण्यात आले असून,

भारतीय न्याय संहितेतील कलमे 118(1), 352, 351(2), 351(3), 189, 191(2), 191(3), 140(3), 49 तसेच भारतीय शस्त्र कायद्यातील कलमे 3 व 25 लावण्यात आली आहेत.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठववाड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, जर या प्रकरणाचा शेवट संतोष वडवळे मारहाण प्रकरणासारखाच झाला, तर पुन्हा एकदा “पोलीस खाते करील तेच होईल” हे अलिखित सत्य कायम असल्याचे स्पष्ट होईल.

आता खरा प्रश्न हा आहे की –

या प्रकरणात खरंच कायदा बोलेल का, की पुन्हा एकदा ‘नावे वगळून’ फाईल बंद केली जाईल?

जीवन घोगरे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी या तपासावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *