![]()
कळमनुरी तालुक्यातील रामेश्वरतांडा बसथांब्यावर एका तरुणाचा रुमालाने गळा आवळून खून झाल्याचा प्रकार मंगळवारी ता. २३ सकाळी उघडकीस आला आहे. आखाडा बाळापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. याप्रकरणात एक जण चौकश
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालु्क्यातील रामेश्वरतांडा येथील बसथांब्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या गळया भोवती रुमालाने आवळल्याचे स्पष्ट झाले असून सदर प्रकार खूनाचा असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामेश्वरतांडा येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
तर घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, जमादार रिठ्ठे, शिवाजी पवार यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर मृतदेह वडगाव येथील ज्ञानेश्वर गाडेकर (३०) या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, ज्ञानेश्वर हा सोमवारी रात्री परिसरातील यात्रेमध्ये गेला होता. त्यानंतर तो घरी आलाच नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले आहे. या शिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी रवाना झाले असल्याचे सुत्रांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
सदर खून नेमका कशामुळे झाले याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे सुत्रांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. मयत ज्ञानेश्वर हा वडगाव शिवारात शेती करीत असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे.
