[ads1]
![]()
गणेशोत्सवानिमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण असताना अभिनेते संजय दत्त यांनी ठाण्यातील प्रसिद्ध ठाण्याच्या महाराजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणेशोत्सव, मराठी भाषा, ठाणे शहर आणि जुन्या आठवणींवर मनमोकळेपणाने भाष्य केले. मराठी भाषेवर आपले प्रेम असून, भविष्यात शिक्षक ठेवून मराठी भाषा शिकण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. संजय दत्त यांनी मराठी भाषेबद्दल बोलताना महाराष्ट्रात दीर्घकाळ राहता आले नसल्याचे सांगितले. त्यांचे शिक्षण शिमला येथे झाले असल्याने तेथील भाषेचा प्रभाव आपल्यावर राहिला. मात्र, महाराष्ट्राशी असलेले आपले नाते आणि मराठी भाषेबद्दलचा आदर कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘मराठी भाषेवर माझे खूप प्रेम आहे. ती व्यवस्थित शिकण्यासाठी भविष्यात 100 टक्के शिक्षक ठेवणार,’ असे त्यांनी सांगितले. ‘महाराष्ट्रात कमी राहिलो, पण मराठी नक्की शिकणार’ आपल्या भाषेविषयीच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला जाणार, याची कल्पना असल्याचेही संजय दत्त यांनी मिश्कीलपणे सांगितले. आपण राष्ट्रीय पातळीवर वापरली जाणारी भाषा बोलतो; मात्र मराठी शिकण्याची आपली इच्छा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात कमी काळ राहिल्यामुळे मराठी भाषेवर अपेक्षित प्रभुत्व मिळवता आले नाही. त्यामुळे आता शिक्षकाच्या मदतीने मराठी शिकण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. ‘ठाणे माझं घर’; शहरातील बदलांचाही उल्लेख संजय दत्त यांनी ठाण्याशी असलेल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. ठाण्यावर माझे खूप प्रेम आहे आणि ठाणे माझे घर आहे, असे ते म्हणाले. लहानपणी ठाण्यात येत असल्याचे सांगताना त्यांच्या मित्राची येथे फॅक्टरी असल्याची आठवणही त्यांनी सांगितली. आमदार रवींद्र फाटक हे आपले मित्र असून, ठाणेकरांचे आपल्यावर असलेले प्रेम पाहता ठाण्यातच घर घ्यावे लागेल, असेही संजय दत्त यांनी मजेशीर अंदाजात म्हटले. ठाण्यातील आपल्या जुन्या आठवणी सांगताना संजय दत्त यांनी 1993 सालचाही उल्लेख केला. त्या काळात आपण ठाण्यातील कारागृहात होतो, असे त्यांनी सांगितले. त्यानंतरच्या काळात ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात विकास आणि बदल झाल्याचे त्यांनी नमूद केले. ‘1993 मध्ये मी ठाण्याच्या जेलमध्ये होतो. तेव्हापासून आतापर्यंत ठाण्यात खूप बदल झाला आहे आणि मोठा विकास झाला आहे,’ असे संजय दत्त म्हणाले. गणपती बाप्पाकडे काय मागितलं? ठाण्याच्या महाराजाचे दर्शन घेतल्यानंतर संजय दत्त यांनी गणपती बाप्पाकडे केलेल्या प्रार्थनेबाबतही माहिती दिली. जगभरात शांतता नांदावी, सर्वांमध्ये बंधुभाव वाढावा आणि प्रत्येकाने एकमेकांचा सन्मान करत एकत्र राहावे, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. ‘पूर्ण विश्वात शांती राहो, भाईचारा राहो, सर्वांचा सन्मान वाढो आणि आपण सगळे एकत्र राहू,’ अशीच आपली गणपती बाप्पाकडे प्रार्थना असल्याचे संजय दत्त यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संजय दत्त यांच्या या वक्तव्याची चर्चा होत असून, मराठी भाषा शिकण्यासाठी शिक्षक ठेवण्याचा त्यांचा निर्धार विशेष लक्षवेधी ठरला आहे.
[ads2]
100% मराठी शिकण्याचा संजय दत्त यांचा निर्धार:‘मराठीवर माझं खूप प्रेम’,1993च्या जेलच्या आठवणींना उजाळा; गणेशोत्सवाबद्दलही व्यक्त केल्या भावना
















Leave a Reply