Rashid Mamu’s unexpected entry heated up politics | रशीद मामूंच्या उबाठा प्रवेशाने राजकारण तापले: शिवसेना-भाजपने टीका करत ‘उबाठा मामू’ असे संबोधले – Chhatrapati Sambhajinagar News
![]()
छत्रपती संभाजीनगर येथे माजी महापौर रशीद मामू यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात (उबाठा) प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या मंत्र्यांनी या प्रवेशावरून उबाठावर जोरदार टीका केली आहे.
.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उबाठावर निशाणा साधत म्हटले की, ‘मतांच्या गणितासाठी उबाठाला आता मामूंची गरज भासत आहे. जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवत होते, त्यांना काँग्रेस किंवा शरद पवार जवळ करत नाहीत. त्यामुळे आता उबाठाचे नाव ‘उबाठा मामू’ असे करावे.’ मामूंचा मातोश्रीवर प्रवेश झाल्याची टीकाही त्यांनी केली.
रशीद मामूंच्या प्रवेशामुळे उबाठाला लागलेली गळती थांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे शिरसाट म्हणाले. त्यांनी उबाठाला काँग्रेस आणि शरद पवारांसोबतची युती तोडण्याचा सल्ला दिला होता, पण त्यांनी ऐकले नाही. आता मुंबईत युतीचा महापौर बसेल आणि लोकांचा कल युतीला मतदान करण्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री अतुल सावे यांनी रशीद मामू यांच्या पूर्वीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महापालिकेत मामूंनी ‘वंदे मातरम्’ला विरोध केला होता आणि ‘पाकिस्तान की जय’ अशा घोषणा दिल्या होत्या, असे सावे यांनी सांगितले. त्यामुळे हे ‘उबाठाचे मामू’ असून, उबाठाचे नामकरण ‘उबाठा मामू’ असेच करावे, अशी टीका सावे यांनी केली.
