![]()
पुणे येथे आयोजित दुसऱ्या रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यास तिला संशोधनाचे व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला. समाजाचे आणि राष्ट्राचे हित
.
डॉ. अभ्यंकर यांनी साहित्य आणि वाङ्मय यातील फरक स्पष्ट केला. साहित्य माणसाला अशांत करते, तर वाङ्मय शांत व स्थिर करते. पुरस्कारांसाठी लिहिलेले साहित्य काही पिढ्या टिकते, पण वाङ्मय अविनाशी, कालातीत आणि निरंतर असते, असे त्यांचे मत होते.
महाराष्ट्राला संतांच्या ग्रंथनिर्मितीमुळे वाङ्मयाचा मोठा इतिहास लाभला आहे. यामुळेच मराठी भाषा प्रौढ, प्रगल्भ आणि प्रसन्न आहे. सातव्या शतकापासून मराठी भाषेचे वैभव महाराष्ट्रात नांदत असून, ज्ञानेश्वर माऊलींनी लावलेल्या वृक्षाची फळे आपण आजही चाखत आहोत, असे ते म्हणाले. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याने ती जगभर पोहोचेल आणि तिला प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या रोटरी डिस्ट्रिक्टने आयोजित केलेल्या या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झाले. प्रसिद्ध कवी, गीतकार प्रा. प्रवीण दवणे हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत, तर नंदन बिल्डकॉनचे संचालक श्यामकांत कोतकर स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाचा शुभारंभ ग्रंथदिंडीने करण्यात आला.
यावेळी संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे, सहकार्याध्यक्ष मोहन चौबळ, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष शुभ्रो सेन, डॉ. दीपक शिकारपूर, तनुजा मराठे, उज्ज्वल केले, नियोजित प्रांतपाल नितीन ढमाले, पंकज शहा, माजी प्रांतपाल शितल शहा तसेच २० सहयजमान क्लबचे अध्यक्ष उपस्थित होते. डॉ. अभ्यंकर यांनी पुढे सांगितले की, साहित्यकृतीला रसिकत्वाचा स्पर्श होतो, पण वाङ्मयाला परतत्वाचा स्पर्श झालेला असतो. साहित्यिकांनी स्वान्त:सुखाय हेतूने निर्मिती करावी, ज्यामुळे अलौकिक आनंद मिळेल.
समाजाच्या एकात्मतेला भेद करणारे साहित्य निर्माण होऊ नये, यासाठी साहित्यिकांनी जागरूक राहावे, असे आवाहन डॉ. अभ्यंकर यांनी केले. कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान असले तरी, मानवी मेंदूच ती निर्माण करतो हे विसरू नये. मानवी बुद्धिमत्तेला विवेकाचा अंकुश असतो, जो कृत्रिम बुद्धिमत्तेला नाही, त्यामुळे मानवाची प्रतिभा, पांडित्य आणि प्रज्ञा याविषयी चिंता निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. आगामी रोटरी साहित्य संमेलनात वाङ्मयावर चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. स्वागताध्यक्ष श्यामकांत कोतकर यांनी, मोलाचे साहित्य लोकांच्या मनात चिरंतन ठेवण्यासाठी साहित्य संमेलनांसारखे उपक्रम महत्त्वाचे ठरतात, असे मत मांडले.
