व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या काळाबाजारावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा छापा

[ads1]

५२ सिलिंडरसह छोटा हत्ती असा ८ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल 

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या कथित काळाबाजारावर मोठी कारवाई केली. उ.न.नगर रस्त्यावरील कोहिनूर मिलसमोर संशयास्पदरीत्या आढळलेल्या टाटा इंट्रा छोटा हत्ती वाहनातून तब्बल ५२ व्यावसायिक गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. वाहनासह जप्त मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत ८ लाख ३४ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पथक गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. वाहन क्रमांक MH-26-CH-4677 संशयास्पदरीत्या आढळल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली. त्यामध्ये व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर मोठ्या प्रमाणावर आढळून आले.

चौकशीदरम्यान वाहनचालकाने आपले नाव श्यामलाल शंकरलाल सारन (वय 32) असून तो चालक व्यवसाय करीत असल्याचे सांगितले. त्याचा सध्याचा पत्ता शिवाजीनगर, मुखेड, जि. नांदेड असा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित सिलिंडर काळ्या बाजारात विक्री तसेच रिफिलिंगसाठी आणण्यात आले होते. मात्र, त्याच्याकडे या गॅस सिलिंडरच्या वाहतूक व विक्रीसाठी कोणताही वैध परवाना किंवा आवश्यक कागदपत्रे आढळून आली नाहीत. या कारवाईत टाटा इंट्रा छोटा हत्ती वाहनाची अंदाजे किंमत २ लाख ३४ हजार रुपये, तर व्यावसायिक गॅस सिलिंडरची अंदाजे किंमत ६ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. अशा प्रकारे एकूण ८ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपी श्यामलाल शंकरलाल सारन याच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. 1189/2026 अन्वये जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील कलम 3 व 7 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 124 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक बी. ई. चव्हाण तसेच पोलीस अंमलदार लक्ष्मण जाधव, जमीर आणि गुरुनाथ कारामुंगे यांचा सहभाग होता.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *