[ads1]
श्रीकृष्णनगर सिडकोतील प्रकार; सहा जणांविरुद्ध गुन्हा, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नवीन नांदेड (प्रतिनिधी) – श्रीकृष्णनगर सिडको परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या काही जणांनी फिर्यादी व साक्षीदारांना धाक दाखवत मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या जवळील रोख रक्कम व चांदीचे ब्रेसलेट असा एकूण २७ हजार ७०० रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली.
याप्रकरणी राजू तारू (वय २०, रा. शास्त्रीनगर, नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता श्रीकृष्णनगर सिडको, नांदेड येथे फिर्यादी व साक्षीदार कार क्रमांक एमएच-२६ सी-९४८५ मध्ये बसलेले असताना आरोपी हरकळसिंग टाक, प्रेमसिंग टाक, बच्चूसिंग बावरी, सुमित सरोदे, प्रेम सरोदे, शोनक शिंदे, मैया चौगुले व त्यांच्यासोबत असलेल्या इतर एका व्यक्तीने संगनमत करून मोटारसायकलवरून येत फिर्यादी व साक्षीदारांना धाक दाखविला. यानंतर आरोपींनी मारहाण करून त्यांच्या जवळील नगदी रक्कम व चांदीचे ब्रेसलेट असा २७,७०० रुपयांचा मुद्देमाल जबरीने काढून घेतला. एवढ्यावरच न थांबता कारचे नुकसान केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा क्रमांक ११९३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता-२०२३ मधील कलम ३१०(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३२४(४) तसेच आर्म्स अॅक्ट कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक तारू करीत असून, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून, घटनेमागील नेमका प्रकार व इतर बाबींचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Post Views: 90
[ads2]
















Leave a Reply