Pune Rural Police arrests accused in double murder case | दुहेरी हत्याकांडातील आरोपी पुणे ग्रामीण पोलिसांकडून जेरबंद: जामखेडनंतर सासवडमध्ये केली होती दुसरी हत्या, रक्तरंजित प्रवास थांबला – Pune News



पुणे ग्रामीण पोलिसांनी दुहेरी हत्याकांडातील आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने गेल्या महिन्यात जामखेड येथे एका व्यक्तीची हत्या केल्यानंतर पुणे जिल्ह्यात येऊन सासवडमध्ये दुसऱ्या खुनाचा गुन्हा केला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे

.

९ डिसेंबर रोजी सासवड शहरातील न्यू आनंद वाईन्सच्या मागील बाजूस असलेल्या एका बांधकाम इमारतीत राजू दत्तात्रय बोराडे (वय ३८, रा. सासवड) यांचा गळा चिरलेला मृतदेह आढळून आला होता. या क्रूर हत्येने सासवडमध्ये खळबळ उडाली होती.

मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनंतर सासवड पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी आरोपींना तात्काळ पकडण्याचे निर्देश दिले होते. पथकाने घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मृत व्यक्तीसोबत दोन अनोळखी व्यक्ती घटनास्थळाकडे जाताना दिसले.

या फुटेजच्या आधारे तपास पथकाने कोंढवा, हडपसरसह विविध भागांत शोधमोहीम राबवली. सासवडमधील आनंद वाईन्स येथे दारू खरेदीसाठी आलेल्या एका संशयित व्यक्तीवर पोलिसांची नजर पडली. चौकशीत त्याने आपले नाव सुरज प्रकाश बलराम निषाद सांगितले. त्याच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्याने सखोल चौकशी केली असता, त्याने साथीदार नीरज गोस्वामी याच्यासह बोराडे यांचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर गोस्वामीलाही ताब्यात घेण्यात आले. दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर त्यांनी हा खून केल्याचे समोर आले आहे.

चौकशीदरम्यान नीरज गोस्वामीने काही आठवड्यांपूर्वीच जामखेड येथे पैशांच्या वादातून विकास मधुकर अंधारे (वय २२) याचा खून केल्याची धक्कादायक माहिती दिली. जामखेड येथील घटनेनंतर तो पुणे जिल्ह्यात कामाच्या शोधात आला होता आणि सासवडमध्ये दारूच्या वादानंतर त्याने दुसऱ्या खुनाची घटना घडवून आणली.

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल आणि अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहायक निरीक्षक वैभव सोनवणे यांच्यासह पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *