डिजिटलायझेशनच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल; विद्यार्थ्यांना सर्व शुल्के आता एका क्लिकवर भरण्याची सुविधा
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने डिजिटल प्रशासन आणि ई-गव्हर्नन्सच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण झेप घेत ‘सेंट्रलाइज पेमेंट गेटवे’ (Centralized Payment Gateway) या अत्याधुनिक ऑनलाइन शुल्क भरणा प्रणालीचा शुभारंभ केला आहे. या अभिनव सुविधेमुळे विद्यार्थ्यांना आणि संबंधित घटकांना विद्यापीठातील विविध प्रकारची शुल्के एकाच डिजिटल व्यासपीठावरून सहज, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने भरता येणार आहेत.
या प्रणालीचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ए. एम. महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार तसेच वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. पतंगे, डॉ. बाविस्कर, डॉ. खडके, नॅक संचालक डॉ. सुरेंद्र रेड्डी तसेच नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. शैलेष वाढेर यांच्यासह विविध संकुलांचे संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापक व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन केंद्रीय पेमेंट गेटवे प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क, पदवी प्रमाणपत्र शुल्क, विविध अर्ज शुल्क तसेच विद्यापीठाशी संबंधित इतर सर्व आर्थिक व्यवहार एकाच ठिकाणी करता येणार आहेत. यामुळे विविध शुल्कांसाठी स्वतंत्र प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता राहणार नाही. विद्यार्थ्यांचा मौल्यवान वेळ वाचणार असून, रांगेत उभे राहण्याची गरज कमी होणार आहे.
विशेष म्हणजे, या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना नगदी रक्कम बाळगण्याची आवश्यकता राहणार नसून डिजिटल माध्यमातून सुरक्षित व्यवहार करता येतील. सर्व व्यवहारांची तत्काळ नोंद उपलब्ध होत असल्याने आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता, अचूकता आणि विश्वासार्हता निर्माण होणार आहे. तसेच व्यवहारांची गती वाढून प्रशासनिक कार्यक्षमतेतही लक्षणीय सुधारणा होणार आहे.
विद्यापीठाने राबविलेल्या ‘पेपरलेस प्रशासन’ संकल्पनेला या उपक्रमामुळे मोठे बळ मिळणार आहे. कागदपत्रांचा वापर कमी होऊन पर्यावरणपूरक व शाश्वत प्रशासन व्यवस्थेकडे वाटचाल करण्यास मदत होणार आहे. डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून विद्यार्थीकेंद्रित, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न या उपक्रमातून अधोरेखित झाला आहे.
संपूर्ण प्रणालीची संकल्पना, निर्मिती व यशस्वी अंमलबजावणी विद्यापीठाच्या संगणक केंद्रामार्फत करण्यात आली आहे. संगणक केंद्राचे सिस्टीम एक्सपर्ट शिवलिंग शंकरराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील तांत्रिक पथकाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेला.
विद्यापीठातील सर्व आर्थिक व्यवहारांचे केंद्रीकरण करून अधिक कार्यक्षम, पारदर्शक, गतिमान आणि विद्यार्थीहिताचे प्रशासन उभारण्याच्या दिशेने ‘सेंट्रलाइज पेमेंट गेटवे’ हा एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. डिजिटल भारताच्या संकल्पनेला पूरक ठरणारा हा उपक्रम विद्यापीठाच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
