[ads1]
लोहा (प्रतिनिधी) : लोहा शहरात दोन अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून पोलिस असल्याचे भासवत ७२ वर्षीय वृद्धाची फसवणूक केल्याची घटना १ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालाजी मारोती गुडमेवार (वय ७२, रा. वाल्मीक नगर, मुखेड) हे लोहा येथे आले असता दोन अनोळखी आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला. आपण पोलिस असल्याची बतावणी करून आरोपींनी फिर्यादीच्या हातातील व गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांबाबत चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी व गळ्यातील सोन्याची अंगठी, चेन असा सुमारे ४९ हजार रुपये किमतीचा ऐवज काढून घेतला.
फिर्यादीचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी सोन्याच्या ऐवजी नकली अंगठी व पोट देऊन तेथून पोबारा केला. काही वेळानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वृद्धाने लोहा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोउपनि. पांचाळ करीत असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, अनोळखी व्यक्तींकडून पोलिस असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक होण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
[ads2]
















Leave a Reply