![]()
पाकिस्तानसोबतच्या युद्धात भारताचा पहिल्याच दिवशी पराभव झाल्याचा धक्कादायक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पाकसोबत युद्ध करणे सरकारची घोडचूक ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध थांबवण्याचा का निर
.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुणे पत्रकार भवनात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य करत वरील दावा केला. आपली अर्थव्यवस्था पाकच्या अर्थव्यवस्थेहून 10 पट मोठी आहे. पण त्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकसोबतचे युद्ध थांबवण्याचा निर्णय का घेतला? हे कळत नाही. यामुळे युद्धाच्या पहिल्याच दिवशी आपला पराभव झाला. मोदींवर कसला दबाव आहे त्याचे उत्तर आपण शोधले पाहिजे. मोदींवर अमेरिकेचा दबाव आहे. परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवरही आपण मागे आहोत, असे ते म्हणाले.
अतिआत्मविश्वासामुळे काँग्रेसचा पराभव
पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेत्यांच्या अतिआत्मविश्वासामुळे पक्षाचा पराभव झाल्याचा दावाही केला. मागील वर्षभरात राज्याच्या राजकारणात बरेच काही घडले. विधानसभा निवडणुकीत आम्हाला अतिआत्मविश्वासाचा फटका बसला. आमच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधले होते, असे ते काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचे कान टोचताना म्हणाले.
निवडणूक आयोगाची विश्वासार्हता घटली
ते पुढे म्हणाले, सध्या राहुल गांधी यांनी बोगस मतदानाचा मोठा मुद्दा हाती घेतला आहे. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी झाली आहे. भाजपने ओबीसी विरुद्ध मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जिथे करता येईल तिथे ध्रुवीकरण केले. आम्ही आमच्या पराभूत उमेदवारांना याचिका दाखल करण्याचे निर्देश दिलेत. मी स्वतःही याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. माझ्याही मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी झाली.
मला मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मते पडली. तरीही माझा पराभव झाला. काँग्रेसने या प्रकरणी 288 मतदारसंघातील डेटा गोळा केला आहे. राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस मतदान कसे होऊ शकते? निवडणूक आयोगाला यावर उपाय करणे शक्य आहे, पण तो करत नाही. त्याला केवळ सत्ताधारी पक्षाला लाभ मिळवून द्यायचा आहे.
चव्हाण म्हणाले, सध्या जे काही सुरू आहे त्याला भाजपचे केंद्रीय नेतृत्व जबाबदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याला जबाबदार आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. पण तो बाहेर काढण्यास विरोधक कमी पडत आहेत. भाजपला पाशवी बहुमत मिळाले. आमचा संघर्षच सुरू आहे. महाराष्ट्रात एकही मोठा प्रकल्प येत नाही, त्याची सरकाला लाज वाटली पाहिजे. हे सरकार कमीशनचे आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. पण संख्याबळाअभावी आमची ताकद कमी पडत आहे.
19 डिसेंबरच्या दाव्यावर काय म्हणाले?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी 19 डिसेंबर रोजी मराठी माणूस पंतप्रधान होईल असा दावा केला. मी तो दावा का केला हे ही सांगितले. तोपर्यंत काय घडते हे पाहू. सरकारने अणुभट्ट्या बाहेरून मागवण्याचा निर्णय घेतला आहे. 2008 पासून परदेशी कंपन्या भारतात आल्या नव्हत्या. पण अदानीला या क्षेत्रात प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गत महिन्यातच अमेरिका अणुचाचण्या सुरू करणार असल्याचे सांगितले. त्यांच्यानंतर साहजिकच रशियाही करणार. भारतही करणार. पण आम्ही त्याला विरोध करणार.
