मतदार याद्यांमधील कथित घोळामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी कळवा स्थित निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वीच ही घटना घडल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
.
राज्य निवडणूक आयोगाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यातील मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कळवा येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केली आहे. मतदार याद्यांमधील कथित घोळांमुळे त्यांनी हे आक्रमक पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
सपाट जमिनीवर इमारती दाखवून मतदारांची नोंदणी
यासंबंधीच्या माहितीनुसार, मनसे कार्यकर्ते सकाळी 11 वाजल्यापासून कळवा स्थित निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित होते. तिथे त्यांनी मतदार याद्यांमधील त्रुटींवर आक्षेप घेत आंदोलन सुरू केले होते. मतदार यादीत अनेक मतदारांची नावे दुबार आलेली आहेत. तसेच जे मतदार हयात नाहीत, त्यांची नावेही यादीत आहेत. जिथे सपाट जमिनी आहेत, तिथे इमारती दाखवून मतदारांची नावे नोंदवण्यात आली आहेत, अशा अनेक तक्रारी त्यांच्या होत्या.
अधिकाऱ्यांकडून केवळ बोलघेवडेपणा सुरू असल्याने संतापले
मनसे कार्यकर्त्यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अधिकाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अधिकाऱ्यांनी केवळ ‘तुमचे प्रश्न सोडवले जात आहेत,’ असे दाखवण्याचा प्रयत्न केला. यावेळी निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइटही चालत नव्हती. या प्रकारामुळे कार्यकर्त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी कार्यालयात तोडफोड करायला सुरुवात केली. मनपा निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेवर आणि कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
हे ही वाचा…
भाजप सरकारकडून जनतेची फसवणूक:आदित्य ठाकरे यांचा घणाघात; डबल इंजिन सरकार असूनही खोट्या घोषणा सुरू असल्याचा आरोप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. केंद्र व राज्यात एकाच विचाराचे सरकार आहे. पण त्यानंतरही भाजप सरकारकडून जनतेची घोर फसवणूक केली जात आहे, असे ते म्हणालेत.
राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे. त्यात मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुकांचा आज कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, भाजपने लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. पण दुर्दैवाने अजूनही लाडक्या बहिणींच्या कोात्यात 2100 रुपयांचा हप्ता जमा झाला नाही. वाचा सविस्तर
