[ads1]
![]()
मुंबई किनारपट्टीजवळ तटरक्षक दलाने धडक कारवाई करत एका संशयित तस्करी करणाऱ्या जहाजाला पकडले आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, रात्रीच्या वेळी जहाजाची तपासणी केली असता त्यात बेकायदेशीर दारूचा साठा आढळून आला. याप्रकरणी बोटीवरील 6 क्रू मेंबर्सना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या कारवाईची सुरुवात 10 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2.10 वाजता झाली. ऑफशोअर ऑईल रिगजवळ एका जहाजाच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच तटरक्षक दलाची यंत्रणा सतर्क झाली. रात्रीच्या अंधारात अधिकाऱ्यांनी या संशयित जहाजाजवळ पोहोचून झडती घेतली. यावेळी जहाजात बेकायदेशीर दारूसह तब्बल 10 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड लपवून ठेवल्याचे उघडकीस आले, जी अधिकाऱ्यांनी तात्काळ जप्त केली. सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही घटना अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. सध्या जप्त करण्यात आलेल्या जहाजामध्ये दारू आणि रोकड वगळता इतर कोणतीही अत्यंत घातक सामग्री आढळलेली नसली, तरी सुरक्षेत कोणतीही तडजोड न करता ताब्यात घेतलेल्या सहाही जणांची कडक चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर मुंबईच्या किनारपट्टीवरील गस्त आणि सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. मुंबईच्या सुरक्षेसाठी सागरी मार्ग नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे, त्यामुळे यंत्रणा अधिक सतर्क असतात. 26 नोव्हेंबर 2008 रोजी अजमल कसाब आणि त्याचे साथीदार समुद्रमार्गेच कुलाबा येथे उतरले होते आणि त्यांनी शहरात मोठा रक्तपात घडवून आणला होता. तसेच, 12 मार्च 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी वापरलेले आरडीएक्स देखील रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी बंदरात समुद्रमार्गेच उतरवण्यात आले होते. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर तटरक्षक दलाची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
[ads2]
मुंबई किनारपट्टीवर तटरक्षक दलाची मोठी कारवाई:तस्करी करणारे संशयित जहाज पकडले, बेकायदेशीर दारूसह 10 लाखांची रोकड जप्त
















Leave a Reply