Shortage of domestic gas cylinders in Achalpur | अचलपुरात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा: नागरिकांना 350 रुपये अधिक मोजून खरेदी करावी लागत आहे – Amravati News



अचलपूर-परतवाडा या जोड शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांना सिलिंडरसाठी ३५० रुपये अधिक मोजावे लागत आहेत. ९०० रुपयांचे सिलिंडर १२५० रुपयांना खरेदी करण्याची वेळ नागरिका

.

नागरिकांच्या तक्रारीनुसार, शहरात दोन गॅस एजन्सीज आहेत, परंतु दोन्ही वितरकांकडून वेळेवर सिलिंडर मिळत नाहीत. गेल्या १५ दिवसांपासून गॅस पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. या परिस्थितीचा फायदा घेत काही ठिकाणी काळाबाजार सुरू आहे, मात्र प्रशासन या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांची सर्रास लूट होत आहे.अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांना दोन गॅस एजन्सींमार्फत एच.पी. गॅसचा पुरवठा केला जातो. धनज प्लांटवरून गॅस सिलिंडरचा पुरवठा होत असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात अनियमितता कशी निर्माण झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी यावर अद्याप ठोस भूमिका घेत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.

विश्वसनीय माहितीनुसार, शहरातील काही अवैध विक्रेत्यांकडून ९०० रुपयांचे घरगुती गॅस सिलिंडर १,२५० ते १,३०० रुपयांना विकले जात आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे. अचलपुरातील दोन व्यक्तींची नावेही या काळाबाजारात चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे दोन्ही गॅस एजन्सीकडील सिलिंडर साठ्याची तत्काळ तपासणी करावी, पुरवठा अपुरा का पडतो याची सखोल चौकशी करावी आणि अवैध गॅस विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.या संदर्भात एजन्सी संचालकांच्या म्हणण्यानुसार, नागपूर येथून अपेक्षित प्रमाणात सिलिंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे. काही एजन्सीकडे स्वतःचे ट्रक नसल्यामुळेही वितरणात अडथळे येत असल्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *