दिव्य मराठी मुलाखत:कॉर्पोरेट जिहादची आरोपी निदा खानला आश्रय का दिला? मतीन पटेल- ओळख लपवून प्रसूतीचे कारण देत निवारा मागितला!
![]()
नाशिक येथील बहुचर्चित ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप असलेला एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याने संपूर्ण वादावर “दिव्य मराठी’ला दिलेल्या एका विशेष आणि रोखठोक मुलाखतीत निदा खानने ओळख लपवून आश्रय घेतल्याचा गौप्यस्फोट केला. आरोपीला आश्रय का दिला? मतीन : केवळ ‘माणुसकी’ नडली. प्रसूतीचे कारण सांगून निवारा मागितला होता. संपूर्ण घटनाक्रम असा आहे की, काही दिवसांपूर्वी निदा खानचे वयोवृद्ध आई-वडील, मावशी आणि काही बुरखाधारी महिला माझ्या जनसंपर्क कार्यालयात आल्या होत्या. त्यांनी आपल्या कुटुंबातील एका महिलेच्या प्रसूतीची वेळ जवळ आली आहे असे सांगितले. फक्त दोन-तीन दिवसांसाठी राहण्याकरिता मदतीची याचना केली होती. माझ्या जनसंपर्क कार्यालयात दररोज शेकडो लोक वेगवेगळ्या मदतीसाठी येतात. केवळ माणुसकीच्या नात्याने मी माझा मित्र हनीफ खान याला फोन केला आणि त्याची एक रिकामी इमारत या कुटुंबाला राहण्यासाठी देण्याची विनंती केली. हनीफने चावी आणून दिली. ती मी त्या कुटुंबाकडे सुपूर्द केली. मुळात, निदा खान स्वतः माझ्या कार्यालयात कधी आलीच नव्हती. पोलिसांना सहकार्य केले का? मतीन : नाशिक पोलिसांचे पथक संभाजीनगरमध्ये दाखल झाले, तेव्हा पोलिस उपायुक्तांनी मला चौकशीसाठी बोलावले होते. सुरुवातीला मला या प्रकरणाची काहीच माहिती नव्हती. मात्र, पोलिसांनी जेव्हा मोबाइल संपर्क व काही तांत्रिक पुरावे समोर ठेवले, तेव्हा प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मी स्वत:च घर दाखवले. तिथून पोलिसांनी निदा खानसह ५ जणांना ताब्यात घेतले. इम्तियाज जलील यांचा संबंध काय? मतीन : माजी खासदार इम्तियाज जलील यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.त्यांचे कुणीही नातेवाईक नाशिकला राहत नाहीत. राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांचे नाव पालकमंत्र्यांनी यामध्ये गोवले आहे. अटकेच्या वेळी मी माझ्या नेत्याला (इम्तियाज ) फोन करण्याचा हट्ट धरला होता. कारण, अचानक उद्भवलेल्या या संकटावेळी कार्यकर्ता म्हणून आम्ही नेत्याकडेच मदत मागतो.
