एका व्यक्तीची पदं गेली, दुसऱ्याचं राजकीय वजन वाढलं:तटकरे, चाकणकर आणि खरात प्रकरण; रोहित पवारांच्या वक्तव्याने नव्या चर्चा

0
3-photo-18_1780637477.png




शेकडो महिलांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात याच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. या प्रकरणाशी संबंधित काही छायाचित्रे आणि जुन्या संबंधांवरून अनेक राजकीय नेते चर्चेत आले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांनी सत्ताधारी आघाडीतील काही नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका करत या संपूर्ण प्रकरणामागे मोठा राजकीय खेळ असल्याचा दावा केला आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरात यांच्यासोबतचे फोटो समोर आल्यानंतर वादाच्या केंद्रस्थानी आल्या होत्या. वाढत्या दबावानंतर त्यांनी प्रथम महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. विरोधकांसोबतच पक्षातील काही घटकांकडूनही दबाव वाढल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना सत्तेतील तिन्ही पक्षांतील काही नेत्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा केला. मात्र, कारवाई आणि राजकीय नुकसान केवळ एका व्यक्तीलाच सहन करावे लागले, असे ते म्हणाले. रोहित पवार यांनी विशेषतः गुवाहाटी येथील कामाख्या देवी दौऱ्याचा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे काही नेत्यांवर निशाणा साधला. 2021 मध्ये रुपाली चाकणकर, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांनी एकत्र गुवाहाटी दौरा केला होता. त्या दौऱ्याशी संबंधित छायाचित्रे काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ‘कामाख्या देवीला गेलेल्या व्यक्तींमध्ये एकाची सर्व पदे गेली, तर दुसऱ्याच्या घरात आणखी एक पद आले’ असे म्हणत अप्रत्यक्ष राजकीय टोला लगावला. दरम्यान, कोकण विधान परिषद मतदारसंघातील घडामोडींनंतर या वक्तव्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या कुटुंबाला विधान परिषदेत आणखी एक प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. कोकणातील निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आल्यानंतर रोहित पवार यांनी या घटनाक्रमाकडे लक्ष वेधले. खासदारकी आणि मंत्रीपदानंतर विधान परिषदेची जागाही त्याच घरात गेल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख त्यांनी केला. राजकीय घडामोडींना ‘पॉलिटिकल गेम’संबोधले आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले की, खरात प्रकरणात अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावे चर्चेत असतानाही केवळ एका व्यक्तीवरच सर्व जबाबदारी टाकण्यात आली. दुसरीकडे, राजकीयदृष्ट्या अधिक प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या व्यक्तींना कोणताही फटका बसलेला दिसत नाही. उलट त्यांच्या राजकीय ताकदीत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. एका व्यक्तीची दोन पदे गेली, तर दुसऱ्या घरात आधीच दोन महत्त्वाची पदे असताना आता तिसरे पदही आले, असा टोला लगावत त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींना ‘पॉलिटिकल गेम’ असे संबोधले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना आणि तर्कवितर्कांना जोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *