डॉ. भापकर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड:स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीची तयारी करणाऱ्यांना मोठी मदत‎

0
240_17805596556a212f27426c7_bhapkar.jpg




सुप्रसिद्ध सनदी अधिकारी, महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सचिव, कवी, लेखक, दिग्दर्शक डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची येथे होणाऱ्या चौथ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. येथील डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीतर्फे आयोजित हे शिबीर आगामी ६ जून रोजी वलगावच्या सिकची रिसॉर्टमध्ये होईल. भापकर हे काही वर्षांपूर्वी अमरावतीचे जिल्हाधिकारी होते. हे विशेष. संमेलनाचे उद्घाटन अमरावती जिल्ह्याच्या सुकन्या, ज्येष्ठ सनदी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनामुळे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीची तयारी करणाऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे. यापूर्वी अशी तीन स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलने झाली आहेत. पहिल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव, सुप्रसिद्ध सनदी अधिकारी, विदर्भपुत्र जे. पी. डांगे होते. दुसऱ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी रवींद्र जाधव होते. तिसऱ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध सनदी अधिकारी, यशदाचे मानद संचालक म्हणून कार्यरत असणारे हरिभक्त पारायण रंगनाथ नाईकडे होते. पहिले स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन येथील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये झाले होते. दुसरे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या गुरुकुंज मोझरी येथील स्मृतिभवनात पार पडले होते. त्यानंतरचे तिसरे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील कविवर्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर सभागृहात झाले होते. या तीनही साहित्य संमेलनांना स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी म्हणून हे संमेलन सातत्याने आयोजित केले जाते. या संमेलनातून विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळते. याशिवाय ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांचे अनुभव, मार्गदर्शन, कवी संमेलन इत्यादी विविध उपक्रम या साहित्य संमेलनांद्वारे राबविले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed