वर्षभरात 7 हजार 600 कापडी पिशव्यांचे केले वितरण:प्लास्टिकमुक्त अकोला; भंडाऱ्यात प्लास्टिक डिस्पोजेबलचा वापर टाळण्यासाठी स्टिलची ताटेही उपलब्ध
![]()
पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या “माय वसुधा विकास संस्थे’तर्फे वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात. लोकांनी प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर टाळावा, यासाठी निःशुल्क कापडी पिशव्या वाटप केल्या जातात. गत पर्यावरण दिनापासून आजपर्यंत एक वर्षात सुमारे ७ हजार ६०० कापडी पिशव्या संस्थेतर्फे निःशुल्क वितरीत करण्यात आल्या. गत १५ वर्षात तर ४३ हजार ६०० कापडी पिशव्या वाटत करण्यात आल्याचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मनीषा पालीवाल यांनी सांगितले. भंडाऱ्यात प्लॅस्टिक डिस्पोजेबलचा वापर टाळण्यासाठी स्टिलची ताटेही उपलब्ध करून देण्यात येतात. मानवी हस्तक्षेपामुळे काही वर्षांत जिल्ह्यातील वनक्षेत्रात सुमारे दोन ते तीन टक्क्यांनी घट झाली आहे. परिणामी येथील वन्यजीव आणि शेतीही धोक्यात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन पर्यावरण िदनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन शहरात करण्यात येते. डॉ. मनीषा पालीवाल आणि डॉ. योगेश पालीवाल यांच्या “माय वसुधा विकास संस्थे’तर्फे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात. दरवर्षी फेब्रुवारी ते जून महिन्यात सीड बँक आणि प्लास्टिक बँक सुरू केली जाते. घरी खाल्लेल्या फळांचे बीज कचऱ्यात न फेकता गोळा करून त्यापासून रोप तयार करण्यात येतात. घरात तेल, दूध, किराणा व इतर वस्तूंसोबत येणाऱ्या जाड प्लास्टिकच्या पिशव्या कचऱ्यात न फेकता त्या गोळा करण्यात येतात. या पिशवीत माती टाकून सीड बँकेत गोळा झालेले बीज टाकून विविध रोप तयार करण्यात येतात. अशा साध्या सोप्या पद्धतीने शून्य खर्चातून रोप तयार केले जातात, असे संस्थेचे भरत पटेल आणि सुषमा गोखले यांनी सांगितले. डॉ. पालीवाल हे दाम्पत्य वर्षभर सायकलवर शहरात विविध ठिकाणी सकाळी फिरून जनजागृती करतात व ज्यांच्या हातात प्लास्टिक कॅरी बॅग दिसेल त्यांना कापडी पिशव्या मोफत देतात. डिस्पोजेबलचा वापर टाळण्यासाठी ताटांचा संच लोकांनी प्लास्टिक डिस्पोजेबलचा वापर टाळावा यासाठी निःशुल्क स्टिलची भांडी उपलब्ध करून देण्यात येतात. संस्थेकडे स्टीलचे ताट १ हजार १०० (खनाचे), गोल प्लेन ताट २००, पाण्याचे ग्लास ११००, चमचे ११००, वाट्या ४००, चहाचे पेले ३००, मठ्ठा-पन्ह्यासाठी पेले ३०० आणि वेस्ट टब ४ आहेत. एवढेच नव्हे तर कित्येकदा लोक येतांना हे साहित्य नेण्यासाठी थैल्या किंवा गोणी आणायला विसरतात. हे लक्षात घेऊन संस्थेने १० मोठ्या बॅगही उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
