लाखांदूर तालुक्यात मेणबत्तीच्या उजेडात रुग्णांवर उपचार:रुग्णांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ प्रशासनाच्या अनास्थेचे धिंडवडे काढणारा!
![]()
डिजिटल इंडिया आणि प्रगत आरोग्य सेवेचे मोठमोठे दावे केले जात असताना, लाखांदूर तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील पिंपळगाव/को. येथील आरोग्य उपकेंद्रात गेल्या तब्बल चार महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना मेणबत्ती किंवा मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात रुग्णांवर उपचार करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ग्रामीण भागातील गरीब रुग्णांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ प्रशासनाच्या अनास्थेचे धिंडवडे काढणारा ठरत आहे. या वृत्तासंबंधीच्या माहितीनुसार, पिंपळगाव/को. येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये परिसरातील शेकडो नागरिक उपचारासाठी येत असतात. प्रामुख्याने गरोदर माता, लहान मुले आणि वृद्ध रुग्णांची संख्या येथे मोठी असते. मात्र, गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून म्हणजे चार महिन्यांपूर्वी या उपकेंद्राचा वीज पुरवठा कोणत्यातरी कारणास्तव खंडित झाला. इतका मोठा कालावधी उलटूनही वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आरोग्य विभाग किंवा महावितरणने साधे पाऊलही उचलले नाही. दरम्यान, लहान मुलांच्या आणि गरोदर मातांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लसी सुरक्षित ठेवण्यासाठी ‘आयस लाईन रेफ्रिजरेटर’ आवश्यक असतो. वीज नसल्याने या लसींचे तापमान राखणे कठीण झाले असून, मौल्यवान लसी खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच संध्याकाळच्या वेळी किंवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तपासण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोबाईल टॉर्च किंवा मेणबत्तीचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान, सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने, पंखे बंद असल्यामुळे रुग्ण आणि कर्तव्यावर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकारी ढिम्म..! लाखांदूर तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे नेहमीच ग्रामीण भागातील रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. या उपकेंद्राची वीज नेमकी थकीत बिलामुळे कापली गेली की तांत्रिक बिघाडामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कारण काहीही असले तरी याचा फटका गरिबांच्या आरोग्याला बसत आहे हे मात्र नक्की. आता तरी संबंधित प्रशासन जागे होऊन येथील अंधार दूर करणार की रुग्णांना अशीच ‘अंधारात’ सेवा मिळणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप..! आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा मानली जाते. जर सरकारी दवाखान्यातच चार-चार महिने लाईट नसेल, तर सर्वसामान्यांनी जायचे कुठे? असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. या गंभीर समस्येकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष असूनही याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश दिलेत – तालुका आरोग्य अधिकारी पिंपळगाव/को. आरोग्य उपकेंद्रातील वीज पुरवठा खंडित असल्याचा प्रकार आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी आमच्या निदर्शनास आता पर्यंत आणून दिला नव्हता. कारण मी एप्रिल महिन्यात या ठिकाणी रुजू झालो. आणि तिथला वीज पुरवठा हा फेब्रुवारी महिन्यापासूनच खंडित झालेला आहे. महावितरणच्या थकीत वीज बिलाच्या समस्येमुळे किंवा काही तांत्रिक कारणांमुळे हा पुरवठा खंडित झाला असावा. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांच्या वीज बिलांचा निधी हा वरिष्ठ पातळीवरून थेट मंजूर होत असतो. या उपकेंद्राच्या वीज जोडणी संदर्भात आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तात्काळ पत्रव्यवहार करू. थकीत देयके भरण्यासाठी निधीची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश स्थानिक कर्मचाऱ्यांना दिले आहेत. येत्या ३ ते ४ दिवसांत येथील वीज पुरवठा पूर्ववत केला जाईल, अशी ग्वाही महावितरणकडून मिळाली असून ही समस्या लवकरच मार्गी लागेल, असे लाखांदूरचे तालुका आरोग्य अधिकारी संजीव नैताम यांनी सांगितले. वीजपुरवठा लवकरच सुरळीत होईल असे सांगितले – मुदाय आरोग्य अधिकारी “पिंपळगाव/को. आरोग्य उपकेंद्रातील फेब्रुवारी महिन्यात वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर लगेच बारव्हा केंद्राला या वीजपुरवठा संबंधित माहिती दिली. त्यांनी असे सांगितले होते की निधी अभावी वरिष्ठांना पत्रव्यवहार केला आहे. तरी तुमचा वीजपुरवठा लवकरच सुरळीत होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. पुन्हा वीजपुरवठा संबंधित बारव्हा आरोग्य केंद्राला विचारणा केली असता त्यांनी पत्रव्यवहार केले आहे. असे सांगण्यात आले.” – डॉ. निधी शहारे, समुदाय आरोग्य अधिकारी पिंपळगाव/ को. आरोग्य विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आरोग्य उपकेंद्रातील वीज पुरवठा येत्या दोन ते तीन दिवसांत सुरळीत न झाल्यास, स्थानिक नागरिक आणि परिसरातील नागरिक सोबत घेऊन आरोग्य विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष घालून, वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी पिंपळगाव/को चे ग्रामस्थ लोकेश कापगते यांनी केली.
