Weather Update | मान्सूनची दमदार एंट्री! केरळमध्ये आज आगमन; महाराष्ट्रातील ‘या’ भागांना अलर्ट

0
sayali-web-2026-06-02T102200.782-1.webp.webp


Weather Update | देशभरातील नागरिक आतुरतेने वाट पाहत असलेला मान्सून अखेर देशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. याचदरम्यान मुंबईत बुधवारी सकाळी अनेक भागांत पावसाने अचानक हजेरी लावली आणि उकाड्याने त्रस्त मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला.

पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३० मेनंतर मान्सूनची रेषा पुढे सरकलेली नसली तरी पुढील २४ तासांत मान्सून केरळमध्ये सक्रिय होऊ शकतो. यासोबतच तमिळनाडूचा काही भाग, लक्षद्वीप बेटे तसेच अरबी समुद्राच्या आग्नेय आणि नैऋत्य भागातही मान्सूनचे वारे पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मंगळवारी सकाळी ८.३० ते बुधवारी सकाळी ८.३० या कालावधीत अंदमान-निकोबार बेटांसह उत्तर कर्नाटकात मुसळधार पावसाची नोंद झाली. मुंबईतही बुधवारी सकाळी विविध भागांत पावसाने दमदार हजेरी लावली.

मुंबईतील अनेक भागांत मुसळधार सरी

मुंबई शहरात सकाळी ७ ते ८ या एका तासात शहर भागात ०.९६ मिमी, पश्चिम उपनगरात ९.८४ मिमी आणि पूर्व उपनगरात १.२५ मिमी पावसाची नोंद झाली.

विशेषतः पश्चिम उपनगरात काही भागांत तासाभरात जोरदार सरी कोसळल्या. वर्सोवा पंपिंग स्टेशन येथे तब्बल ६९ मिमी पाऊस झाला. कूपर रुग्णालय परिसरात ५२ मिमी, के-पूर्व विभागात ४९ मिमी, के-पश्चिम विभागात ४६ मिमी तर मालपा डोंगरी शाळा परिसरात ३९ मिमी पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे ३० मिमी तर बीकेसी अग्निशमन केंद्रात १६ मिमी पाऊस पडल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

तापमानात घट, उकाड्यापासून दिलासा

पावसामुळे आणि वेगवान वाऱ्यांमुळे मुंबईतील तापमानातही घट झाली. मंगळवारी कुलाबा येथे ३५.६ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे ३६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते. बुधवारी हे तापमान घटून कुलाब्यात ३४.७ अंश आणि सांताक्रूझमध्ये ३३.८ अंश सेल्सिअसवर आले.

प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज ४ जून रोजीही मुंबईत कमाल तापमान ३३ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. दिवसभर आकाश ढगाळ राहील आणि काही भागांत मुसळधार पावसाच्या सरी कोसळू शकतात.

मुंबई, ठाणे आणि पालघरला यलो अॅलर्ट

मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना आज यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर पुढील तीन दिवस या भागांत पावसाचा जोर काहीसा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दुसरीकडे, दक्षिण कोकणात रविवारपर्यंत यलो अॅलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.

News Title: Weather Update Mumbai Monsoon Arrival Kerala IMD Yellow Alert

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *