कोट्यवधी वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या सावळ्या विठूरायाची आणि रुक्मिणी मातेची मूर्ती चिरकाल सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. मूर्तीचे दीर्घकालीन जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने गुरुवारी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ तज्ज्ञांमार्फत विठ्ठल मूर्तीचे निरीक्षण करण्यात आले. या संदर्भातील आवश्यक सल्लामसलत करुन पुढील दोन ते तीन दिवसांत संवर्धनाचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली. मूर्ती संवर्धना संदर्भात आयोजित बैठकीनंतर जिल्हाधिकारी पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीस मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समिती व सल्लागार परिषदेचे सदस्य, स्थानिक महाराज मंडळी, पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मूर्ती संवर्धन तज्ज्ञ उपस्थित होते. एस. सुब्रमण्यम,भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (छत्रपती संभाजीनगर) चे उपअधीक्षक डॉ. विनोद कुमार, सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहने यांच्यासह देशपातळीवरील तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन घेत या विशेष बैठकीत मूर्ती संवर्धनातील तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा झाली. . प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे व अवशेष कायदा १९५८ नुसार मूर्ती अथवा स्मारक केंद्रीय संरक्षित स्मारक असेल तर केंद्र शासनाची परवानगी आवश्यक असते. मूर्तीच्या लायडार स्कॅन करीता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय परवानगी देऊ शकते. . हे स्कॅनिंग लेझर तंत्रज्ञानाद्वारे मूर्तीची अंतर्गत रचना डिजिटल स्वरूपात रेकॉर्ड होते. स्कॅनिंगचा प्राचीन मूर्तीवर काही परिणाम होणार नाही, याच्या खात्रीसाठी तज्ज्ञांची परवानगी लागते. मूर्तीचे पावित्र्य, भौतिक संरक्षण आणि डेटा सुरक्षित ठेवणे, यासाठी केंद्राची पूर्वपरवानगी आवश्यक असते. देवाला दररोज होणाऱ्या नित्योपचारात दही, दूध, मध आणि साखर यांसारख्या पदार्थांचा वापर केला जातो. यामुळे मूर्तीच्या आतील बाजूस काही नुकसान किंवा झीज झाली आहे का, याची अचूक तपासणी करण्यासाठी बैठकीत लायडार स्कॅन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, या स्कॅनिंग तंत्रज्ञानामुळे मूर्तीला कोणतीही हानी पोहोचणार नाही ना, याचा सखोल अभ्यास केला जाईल. तसेच या स्कॅनिंगसाठी केंद्र शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन म्हणाले की, “भारतभरात पंढरपूर हे एकमेव असे मंदिर आहे, जिथे भाविकांना थेट देवाचे पददर्शन घेता येते. त्यामुळे मूर्ती दीर्घकाळ सुरक्षित राहावी, यासाठी तिचे जतन व संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. मूर्तीला वज्रलेप करण्याबाबत विविध तज्ज्ञांनी आपली तांत्रिक मते मांडली आहेत. कोणती रासायनिक किंवा पारंपरिक पद्धत वापरायची, याबाबत पुरातत्त्व विभागाचा अंतिम सल्ला घेऊन पुढील दोन-तीन दिवसांत निर्णय जाहीर केला जाईल. अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले की, श्री विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू असून ती कोट्यवधी वारकरी भाविकांचा श्वास आहे. मूर्तीचे जतन व संवर्धन करण्यास मंदिर समितीचा किंवा कोणाचाही विरोध नाही. मात्र, हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने सर्व महाराज मंडळी, पुरातत्त्व विभाग आणि तज्ज्ञांना विश्वासात घेऊन, सामोपचारानेच तो निर्णय घेतला जाईल.