नाशिकनंतर पुण्यात आयटी कंपनीत कॉर्पोरेट जिहाद:हिंदू महिला कर्मचाऱ्यावर धर्मांतरासाठी दबाव
![]()
नाशिकनंतर महाराष्ट्राची आयटी राजधानी असलेल्या पुण्यातही (हिंजवडी) कॉर्पोरेट जिहादचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला इस्लाम स्वीकारण्यासाठी आणि अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने मानसिक त्रास देण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, या अन्यायाविरुद्ध दाद मागितल्यावर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘मायक्रोसॉफ्ट टीम्स’च्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा गैरवापर करत तिच्या लॅपटॉपचा ताबा (स्क्रीन कंट्रोल) घेत आणि नकळत तिचा परस्पर राजीनामा दाखल करून तिची नोकरी हिरावून घेतली. पीडित महिलेने पत्रकार परिषदेत स्वतःवर ओढवलेल्या या भयंकर प्रसंगाची आपबीती मांडली. ती या मोठ्या कंपनीत काम करत असताना तिच्याच टीममधील एका महिला सहकाऱ्याने तिला नाहक त्रास देण्यास सुरुवात केली. ओळखीच्या एका मुस्लिम व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवावेत आणि स्वतःचा हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारावा, यासाठी तिच्यावर सतत दबाव टाकला जात होता. परदेशात ऐषोआरामात राहण्याचे आमिषही तिला दाखवण्यात आले. मात्र, तिने या सर्व गोष्टींना ठामपणे नकार दिला. या सततच्या मानसिक छळाला कंटाळून पीडितेने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. पण न्याय मिळण्याऐवजी तिची घोर निराशा झाली. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि एचआर कमिटीच्या सदस्यांनी दोषींवर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच पाठीशी घातले. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस एका ऑनलाइन मीटिंगदरम्यान एचआर प्रतिनिधीने तिचा लॅपटॉप कंट्रोलमध्ये घेतला आणि परस्पर तिचा राजीनामा कंपनीला सादर केला. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा चौकशीशिवाय तिला थेट कामावरून कमी करण्यात आले. सध्या या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून हिंदू जनजागृती समितीने या प्रकाराला वाचा फोडली आहे. पुण्याच्या आयटी क्षेत्रातील हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशारा देत समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, संबंधित मोठ्या कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकलेला नाही. नुकसानभरपाई आणि कारवाईची मागणी नोकरी व सन्मान हिरावल्याने खचलेल्या या महिलेने कायदेशीर लढा उभारला आहे. तिने वकिलांमार्फत संबंधित कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. बळजबरीने घेतलेला हा बेकायदा राजीनामा रद्द करून पूर्ण वेतनासह तिला पुन्हा नोकरीवर घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मानसिक त्रासाबद्दल ५० लाखांची नुकसानभरपाई व कंपनीने लेखी माफी मागावी, असेही नोटिसीत नमूद केले आहे. अशा छळाला बळी पडणाऱ्या महिलांनी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीने केले आहे. ‘पॉश’ कायद्यांतर्गत तपासाला वेग “या संवेदनशील प्रकरणात संबंधित मोठ्या आयटी कंपनीने ‘पॉश’ कायद्यांतर्गत आतापर्यंत नेमकी काय कारवाई केली आहे, याचा आम्ही सखोल तपास करत आहोत. तसेच, आरोपी महिला बॉसला चौकशीला हजर राहण्यासाठी आणि तिचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांतर्फे नोटीस बजावण्यात आली असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.” – बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी पोलिस ठाणे
