हुंड्यामोख शिवारात 1300 लिटर हातभट्टीचे रसायन जप्त:कळवण पोलिस ठाण्याच्या पथकाची धडक कारवाई
![]()
कळवण पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत धडक कारवाई करत गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले सुमारे १३०० लिटर रसायन व साहित्य जप्त केले. या कारवाईत ४८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुंड्यामोख-दयाणे दिगर शिवारातील बंधाऱ्याखालील नाल्यालगतच्या झाडाझुडपांमध्ये छापा टाकण्यात आला. या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे सुमारे १३०० लिटर रसायन साठवून ठेवलेले आढळले. याशिवाय १०० लिटर क्षमतेचे १३ प्लास्टिक ड्रमही जप्त करण्यात आले. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी लक्ष्मण तानाजी बोरसे (रा. हुंड्यामोख, ता. कळवण) हा घटनास्थळावरून फरार झाला. त्याच्याविरुद्ध कळवण पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई अनिल सोमनाथ बहिरम यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास हवालदार शेवाळे करीत आहेत. गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी गूळ, नवसागर आणि इतर घटकांचे मिश्रण आंबवून रसायन तयार केले जाते. हे रसायन दीर्घकाळ साठवून त्यापासून अवैधरित्या मद्यनिर्मिती केली जाते. आंबवलेले रसायन आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. अशा अवैध मद्याच्या सेवनामुळे विषबाधा, अंधत्व, यकृताचे गंभीर आजार तसेच मृत्यूचाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा दारूनिर्मितीवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जाते.
