Sunrisers Hyderabad | ‘हा’ दिग्गज खेळाडू होणार SRH चा कर्णधार? पॅट कमिन्सच्या ‘त्या’ निर्णयाने क्रिकेट जगतात खळबळ!
Sunrisers Hyderabad | आयपीएल 2026 संपल्यानंतर आता पुढील हंगामासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. अशात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाच्या नेतृत्वाबाबत मोठी चर्चा रंगली आहे. सध्याचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) पुढील हंगामात स्पर्धेत सहभागी होण्याबाबत साशंक असल्याने इशान किशन (Ishan Kishan) याच्याकडे पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Sunrisers Hyderabad | आयपीएल 2026 च्या सुरुवातीच्या टप्प्यात पॅट कमिन्स उपलब्ध नसताना इशान किशनने संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने समाधानकारक कामगिरी केली होती. नंतर कमिन्स परतल्यानंतर पुन्हा कर्णधारपद त्याच्याकडे देण्यात आले. मात्र आता पुढील हंगामासाठी परिस्थिती बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
एका कार्यक्रमात बोलताना कमिन्सने पुढील वर्षी होणाऱ्या ॲशेस मालिका (Ashes Series) आणि एकदिवसीय विश्वचषकाला (ODI World Cup) प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील व्यस्त वेळापत्रक आणि वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेता फ्रँचायझी क्रिकेटमधील काही स्पर्धा सोडाव्या लागू शकतात, असेही त्याने संकेत दिले. त्यामुळे आयपीएल 2027 मध्ये त्याच्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
Sunrisers Hyderabad | इशानकडे नेतृत्वाची संधी वाढली :
यंदाच्या आयपीएलमध्ये कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्सचा प्रवास एलिमिनेटर फेरीपर्यंत पोहोचला. मात्र त्याची वैयक्तिक गोलंदाजी अपेक्षेप्रमाणे प्रभावी ठरली नाही. त्याने आठ सामन्यांत केवळ 8 विकेट्स घेतल्या आणि त्याचा इकॉनॉमी रेटही 11 पेक्षा जास्त राहिला. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात त्याने 64 धावा खर्च केल्याने संघावर दबाव निर्माण झाला होता.
दुसरीकडे, इशान किशनने कमिन्सच्या अनुपस्थितीत आठ सामन्यांत संघाचे नेतृत्व केले. त्यापैकी पाच सामन्यांत विजय मिळवण्यात तो यशस्वी ठरला, तर तीन सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे संघ व्यवस्थापन त्याच्याकडे भविष्यातील कर्णधार म्हणून पाहत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कमिन्सने आयपीएलपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यास इशान किशनकडे पूर्णवेळ कर्णधारपद जाण्याची शक्यता अधिक मजबूत मानली जात आहे.
