Delhi Fire Malviya Nagar | दिल्लीतील मालवीय नगरमध्ये भीषण आग; 21 जणांचा होरपळून मृत्यू

0
sayali-web-2026-06-03T133353.770.webp.webp


Delhi Fire Malviya Nagar | राजधानी दिल्लीच्या (Delhi) मालवीय नगर (Malviya Nagar) परिसरात एका 5 स्टार हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ‘लेमन ग्रीन’ (Lemon Green) नावाच्या हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी पावणेदहाच्या (९.४५) सुमारास ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाने (Delhi Fire Service) तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून इमारतीमध्ये अडकलेल्या ३७ नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. मात्र, या आगीत अनेक जण गंभीररीत्या भाजले असून, त्यांच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत.

जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून उड्या

आग इतक्या वेगाने भडकली होती की, काही क्षणांतच इमारतीबाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले. अशा भयानक परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी नागरिकांची मोठी धावपळ उडाली. अखेर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून इमारतीखाली जमिनीवर गाद्या टाकल्या. या गाद्यांच्या आधारावर अनेकांनी बाल्कनी, खिडक्या आणि वरच्या मजल्यांवरून खाली उड्या मारल्या आणि आपला जीव वाचवला. दक्षिण जिल्ह्याचे उपविभागीय दंडाधिकारी (SDM) जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, इमारतीच्या तळमजल्यावर हे हॉटेल सुरू होते आणि प्राथमिक अंदाजानुसार तिथूनच या आगीचा भडका उडाला. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

प्रशासनाकडून तपासणीचे आदेश आणि पंतप्रधानांकडून मदत जाहीर

या भीषण दुर्घटनेनंतर दिल्ली प्रशासन खडबडून जागे झाले आहे. निवासी भागांमध्ये किती हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना व्यवसाय करण्यासाठी परवाने देण्यात आले आहेत, याची सविस्तर माहिती आता महानगरपालिका प्रशासनाकडे मागवण्यात आली आहे. तसेच, अशा सर्व व्यावसायिक आस्थापनांची नियमित आणि कठोर तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या दुःखद घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पीडित कुटुंबीयांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करत जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. तसेच, मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

News Title: Delhi Fire Malviya Nagar Hotel Tragedy 21 dead

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *