ताडोबा वेबसाईट हॅक झाल्याची अफवा; प्रशासनाची माहिती:30 जूनपासून कोअर एरिया सफारी बंद, बफर झोन सुरू राहणार
![]()
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची ऑनलाईन बुकिंग वेबसाईट हॅक झाल्याची समाजमाध्यमांवर पसरलेली माहिती पूर्णपणे खोटी आणि अफवा असल्याचे ताडोबा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासोबतच, दरवर्षीप्रमाणे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आगामी ३० जून ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी ताडोबाचा मुख्य वनक्षेत्र (कोअर झोन) पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ला यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. गेल्या २० मे रोजी यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका अज्ञात व्यक्तीने ताडोबाची अधिकृत ऑनलाईन सफारी बुकिंग वेबसाईट हॅक केल्याचा दावा करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. हॅकरने ८० टक्के तिकिटे स्वतःच्या ताब्यात घेऊन ती विकत असल्याचा खोटा दावाही केला होता. या गंभीर दाव्यानंतर ‘एनआयसी’च्या व्यवस्थापन टीमने संपूर्ण बुकिंग प्रणालीची सखोल चौकशी व तांत्रिक तपासणी केली. या तपासाअंती ताडोबाच्या बुकिंग पोर्टलमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा त्रुटी किंवा हॅकिंग झाले नसल्याचे सिद्ध झाले. ताडोबाची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूनेच ही खोटी पोस्ट टाकण्यात आली असल्याने, प्रशासनाने या प्रकरणी पोलिसात रीतसर फौजदारी तक्रार दाखल केली आहे. पर्यटकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला, वन्यजीव संवर्धन आणि पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून ३० जून २०२६ पासून ताडोबाचा ‘कोअर झोन’ पर्यटनासाठी पूर्णपणे बंद केला जाणार आहे. ३० जून रोजी मंगळवार असून हा ताडोबाचा साप्ताहिक सुटीचा दिवस असल्याने, याच दिवसापासून मान्सून बंदची अंमलबजावणी सुरू होईल. मात्र, वन्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे या काळात ताडोबाचे सर्व ‘बफर झोन’ आणि त्याअंतर्गत येणारे सफारी गेट्स पर्यटनासाठी नियमित सुरू राहणार आहेत. बफर झोनमधील सफारी केवळ हवामानाच्या परिस्थितीवर आणि वेळोवेळी मिळणाऱ्या प्रशासकीय सूचनांवर अवलंबून असेल. या बफर गेट्ससाठीची ऑनलाईन बुकिंग सुविधा नेहमीप्रमाणे सुरू राहणार असून, पर्यटकांनी या बदललेल्या नियमांचा विचार करूनच आपल्या सफारीचे नियोजन करावे, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.
