[ads1]
![]()
दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर मंडप आणि लोखंडी स्ट्रक्चर उतरवण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जुन्या सांगवी परिसरात घडली. सलमा सलाउद्दीन पठाण असे मृत महिलेचे नाव आहे. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जुन्या सांगवीतील लेन क्रमांक 2 येथे विघ्नहर्ता मित्र मंडळ आणि विघ्नहर्ता दहीहंडी मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सव संपल्यानंतर मंडप आणि लोखंडी कमान काढण्याचे काम सुरू करण्यात आले. याचवेळी ही दुर्घटना घडली. नेमकं प्रकरण काय आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास फुटली. त्यानंतर काही वेळातच मंडप आणि इतर लोखंडी साहित्य काढण्याचे काम सुरू झाले. सलमा पठाण ह्या त्यांचे पती सलाउद्दीन पठाण यांच्यासोबत घटनास्थळी होत्या. दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर दोघेही घरी जाण्यासाठी निघाले होते. मात्र, तेथून जात असतानाच मंडपाची लोखंडी कमान उतरवली जात होती. यावेळी एक लोखंडी रॉड अचानक खाली पडला आणि तो सलमा यांच्या डोक्यावर आदळला. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी औंध रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. मुलगा मंडळाचा कार्यकर्ता या घटनेतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सलमा पठाण यांचा मुलगा रहीम पठाण हा याच दहीहंडी मंडळाशी संबंधित असून मंडळाचा कार्यकर्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या घटनेनंतर पठाण कुटुंबीयांनी मंडळातील कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करण्यास नकार दिला. कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, मंडळातील कार्यकर्ते आपल्याच मुलांसारखे आहेत आणि त्यांचा मुलगाही मंडळात सहभागी आहे. त्यामुळे कोणावरही पोलिस कारवाई होऊ नये, अशी त्यांची भूमिका असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कुटुंबीयांशी चर्चा करून, काही तक्रार असल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले. मात्र, कुटुंबीयांनी तक्रार देण्यास नकार दिल्याने सध्या या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची (AD) नोंद करण्यात आली आहे. सांगवी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर मंडपाची कमान उतरवताना लोखंडी रॉड खाली पडला आणि त्याच्या धडकेत सलमा पठाण यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी साउंड सिस्टीम किंवा अन्य वस्तू पडल्याची चर्चा चुकीची असून कमान उतरवताना लोखंडी रॉड पडल्यानेच हा अपघात झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या घटनेनंतर जुन्या सांगवी परिसरात शोककळा पसरली आहे. उत्सवाचा आनंद संपल्यानंतर काही वेळातच घडलेल्या या दुर्घटनेमुळे पठाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून तपासात काही नवीन बाब समोर आल्यास त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हेही वाचा.. राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष:मुंबईत 9 व्या थरावरून गोविंदा कोसळला; CM फडणवीसांनी मुंबईत फोडली हंडी, घाटकोपरमध्ये रितेश देशमुखची हजेरी राज्यभरात आज दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. यंदा विविध दहीहंडी आयोजक आणि मंडळांकडून निष्णात गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय, अनेक नामांकित हंड्यांच्या ठिकाणी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांची खास उपस्थिती हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.सविस्तर वाचा..
[ads2]
पुण्यात दहीहंडी उत्सवानंतर भीषण दुर्घटना!:मंडपाची लोखंडी कमान उतरवताना रॉड डोक्यावर पडला; 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू
















Leave a Reply