अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवले:नगरसेवक किशोर मासाळांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; अन्नत्याग करून आत्मकलेश करणार- मासाळ
![]()
बारामती नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्याविषयी नुकतेच एक आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षाच्या सर्व नगरसेवक-नगरसेविकांनी या घटनेचा कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. तसेच, या प्रकरणी किशोर मासाळ यांनी आपल्या नगरसेवक पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे एक स्वाक्षरीयुक्त निवेदनही तयार करण्यात आले. दरम्यान, या गंभीर प्रकाराची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी किशोर मासाळ यांची पक्षातून अधिकृतरीत्या हकालपट्टी केल्याची घोषणा केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व नगरसेवकांनी एकत्र येत ‘सहयोग’ या निवासस्थानी जाऊन दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत त्यांना विनम्र अभिवादन केले. त्यानंतर, किशोर मासाळ यांच्यावर कारवाई आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे सह्यांचे निवेदन सुनेत्रा पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सचिन यादव यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले. अजितदादा पवार यांच्याबद्दल करण्यात आलेले वक्तव्य बारामतीकरांच्या भावना दुखावणारे असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सर्व नगरसेवकांनी या घटनेचा कडक शब्दांत निषेध नोंदवला. ‘अशा अपमानास्पद वक्तव्यांना जनतेचे कधीही समर्थन मिळणार नसून, संबंधित नगरसेवकावर त्वरित कठोर कारवाई करावी आणि त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात यावा,’ अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, गटनेते संजय संघवी, उपगटनेते संपदा चौधर आणि प्रतोद विशाल हिंगणे यांच्यासह सभापती अमर धुमाळ, नवनाथ बल्लाळ, जयसिंग देशमुख, सविता जाधव व मनीषा चव्हाण तसेच नगरसेवक जय पाटील, विष्णुपंत चौधर, बिरजू मांढरे, अभिजीत चव्हाण, अभिजीत जाधव, अविनाश निकाळजे, अनुप्रिता डांगे-तांबे, रुपाली मलगुंडे, प्रवीण माने, धनश्री बांदल, भारती शेळके, प्रसाद खारतोडे, पूनम चव्हाण, मनिषा बनकर, सारिका वाघमारे, मंगल किर्वे, मंगल जगताप, गोरख पारसे, शर्मिला ढवाण, अल्ताफ सय्यद, अश्विनी सातव, राजेंद्र सोनवणे, प्रतिभा खरात, अफ्रिन बागवान, दर्शना तांबे, निलेश इंगुले, सोमनाथ गजाकस, अमोल कावळे, गणेश जोजारे आणि राहुल वाघोलीकर आदींच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन देण्यात आले. मला सुनेत्रा पवारांनी राजीनामा मागितला नाही- किशोर मासाळ दुसरीकडे, आपल्या राजीनाम्यासाठी रोहित पवार यांची सोशल मीडिया टीम बारामतीत सक्रिय असल्याचा आरोप किशोर मासाळ यांनी केला आहे. ‘पक्षाच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनी अद्याप माझ्याकडे राजीनाम्याची कोणतीही मागणी केलेली नाही. तसेच माझा राजीनामा मागण्याचा अधिकार स्थानिक तालुकाध्यक्ष किंवा शहराध्यक्षांना नाही, असे स्पष्ट करत आपण नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नसल्याची ठाम भूमिका मासाळ यांनी मांडली आहे. पत्रकार परिषद घेत किशोर मासाळ यांनी माफी मागितली दरम्यान, पत्रकार परिषद घेत किशोर मासाळ यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. ते म्हणाले, चार दिवसांपूर्वी माझी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्या ऑडिओ क्लिपमध्ये माझ्याकडून स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल एक चुकीचे वक्तव्य गेले. सुरुवातीलाच मी याबद्दल अजितदादा यांचे सर्व कुटुंबीय, समस्त बारामतीकर आणि अजितदादांवर प्रेम करणारे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हात जोडून माफी मागतो. पुढे बोलताना किशोर मासाळ म्हणाले, माझ्याकडून निघालेले वक्तव्य नक्कीच चुकीचे आहे. त्याबद्दल मला पश्चाताप होत आहे. याबद्दल बारामतीकरांच्या भावना तीव्र आहेत. परंतु, माझ्या या वक्तव्याच्या आडून राजकारण होत आहे. सदर घटनेत मला पश्चाताप झाला असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून मी उद्या (दिनांक 9) रोजी सकाळी 8.45 पासून स्वर्गीय अजितदादा यांच्या अपघात घटनास्थळी एक दिवसाचा अन्नत्याग करून आत्मकलेश करणार आहे.
