वैनगंगा नदीत खाजगी बोट उलटली:भंडाऱ्यामध्ये दोघे बुडाले, पाच जणांनी पोहून वाचवले प्राण

0
2ee8b421-b89e-48c1-b0e4-32e4406cfcd5_1780907685586.jpg




भंडारा जिल्ह्यातील करचखेडा येथे वैनगंगा नदीत रविवारी सायंकाळी एका खासगी बोटीला अपघात झाला. आंघोळीसाठी गेलेल्या सात मित्रांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला, तर पाच जणांनी पोहून आपले प्राण वाचवले. ही घटना सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. भंडारा आणि पवनी परिसरातील सात मित्र रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी करचखेडा येथील वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर गेले होते. तेथून ते एका खाजगी बोटीने नदीच्या मध्यभागी असलेल्या बेटावर आंघोळ करण्यासाठी गेले. आंघोळ आटोपून परत येत असताना, नदीच्या मध्यभागी अचानक बोटीचा तोल जाऊन ती उलटली. या अपघातात पवन मुरली चौबे (वय ३४, रा. आंबेडकर वार्ड, भंडारा) आणि कृष्णा जगन्नाथ बोकडे (वय २६, रा. चांदनी चौक, भंडारा) हे दोघे युवक नदीच्या खोल पाण्यात बुडाले. आकाश केवट (वय २७), सुबोध विलास ढोक (वय २६), काशीनाथ फत्तु मेश्राम (वय ३२), मृनाल बाळकृष्ण मंदुकर (वय २०) आणि अर्जुन मोतीराम मेश्राम (वय २९) या पाच जणांनी मात्र पोहून नदीचा किनारा गाठला आणि स्वतःचा जीव वाचवला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा नियंत्रण कक्ष आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. बुडालेल्या पवन चौबे आणि कृष्णा बोकडे या दोन्ही युवकांचा शोध घेण्यासाठी सध्या नदीपात्रात शोधमोहीम राबवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *