अवैध वाळू उपशावर पोलिसांचा मोठा छापा; 76.50 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैद्य कारभारावर आळा लावण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी, बिलोली व कुंटूर पोलिस स्टेशनच्या संयुक्त पथकाने अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई करत तब्बल 76 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गुप्त माहितीनुसार 31 मे रोजी पहाटे 1.20 वाजण्याच्या सुमारास नायगाव तालुक्यातील आंतरगाव शिवारातील गोदावरी नदीपात्राजवळ छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले.
छाप्यात एक हायवा, दोन ट्रॅक्टर-ट्रॉली, एक जेसीबी, दोन मोटारसायकली तसेच सहा ब्रास वाळू असा एकूण 76.50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कुंटूर पोलिस ठाण्यात संजय नागेश हंबर्डे (20) गोपीनाथ बालाजी हंबर्डे (30) रा. धनज ता. नायगाव,गोविंद तुळशीराम शिंदे (30) गोविंद सखाराव शिंदे (30) मोहन सखाराव शिंदे (38) विश्वंभर नागोराव शिंदे (४२) रा. अंतरगाव ता. नायगाव, पांडुरंग हणमंत इबीतवार,बळवंत गोविंद शिंदे,भिवाजी सीताराम तोडे,गजानन भाऊराव तोडे,शंकर बाबाराव शिंदे अश्या ९ जणांविरुद्ध गुन्हा क्रमांक 131/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 30(2) व 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहा जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक करामुंगे हे करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेंगावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अरविंद घोडके.पोलीस उप निरीक्षक मालिकार्जून कारमुंगे,गजानन तोटेवाड,पोलीस अंमलदार कंधारे,मुंडकर,पल्लेवाड,रेडे,शिंदे,नरवाड,कोल्हे,भोसले यांनी केली. पोलिस अधीक्षकांनी कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

