परिवर्तनाच्या संघर्षात प्रमुख मूक शक्ती बनून कार्यरत होत्या रमाई:बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराच्या समारोपप्रसंगी एम.डी. सरोदे यांचे प्रतिपादन
![]()
त्यागमूर्ती माता रमाईंचे जीवन हे केवळ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची पत्नी म्हणूनच नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाच्या महान संघर्षामागील एक मूक शक्ती म्हणून त्या कार्यरत होते. रमाईंच्या जीवनात सुखापेक्षा दुःख अधिक होते. अनेक संकटे, मुलांचे निधन, आर्थिक अडचणी आणि एकाकीपणा सहन करूनही त्यांनी कधीही तक्रार केली नाही. बाबासाहेबांच्या ध्येयावर त्यांचा अढळ विश्वास होता. म्हणूनच त्यांना त्यागमूर्ती माता रमाई असे संबोधले जाते, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे उपप्रमुख तथा कवी, लेखक एम.डी. सरोदे यांनी केले. भारतीय बौद्ध महासभेची बड़नेरा शहर शाखा आणि नांदगाव खंडेश्वर तालुका शाखेच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध यांची जयंती व त्यागमूर्ती आई रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर पार पडले. या शिबिराचा समारोप तथा धम्म मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. कपिल मंडळ बुद्ध विहार, अशोक नगर येथे आयोजित या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भन्ते शक्यपुत्र राहुल, राज्य संघटक विजयकुमार चोरपगार, भदंत नागसेन भदंत सारीपुत्त, भदंत महामोगलायन, भदंत आनंद यांच्यासह ४१ श्रामणेर, महिला जिल्हाध्यक्ष संगीता सरदार, महानगर अध्यक्ष प्रमिला शेंडे, गणपत तिडके, जिल्हा संघटक मुरलीधर रायबोर्ड, माजी सभापती प्रकाश बनसोड, केंद्रीय शिक्षक विलास आठवले धम्मपिठावर विराजमान होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश बोरकर होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरकर यांनी केले, संचालन विलास नागदीवे, तर आभार महिला सरचिटणीस सुनिता भटकर यांनी मानले. दहा दिवसीय श्रामनेर शिबिराला यशस्वी करण्याकरिता बडनेरा शहराध्यक्ष के.डी. सांबारे, सरचिटणीस विलास नागदिवे, कोषाध्यक्ष विजय बागडे, सुरेश दहाटे, व्ही.एस. मेश्राम, अशोक बनसोड, मदन मेश्राम अरुण मेश्राम, देवानंद बळगे, अरुण शेंडे, कैलास ढोके, साहेबराव मोहोड, गोवर्धन रामटेके, चंद्रशेन गजभिये, आनंदा सहारे, पंजाबराव गेडाम, हरिदास घोडेस्वार, प्रकाश बागडे, अशोक तायडे, काशिराव अडकणे, किशोर खोब्रागडे, प्रल्हाद इंगळे, धर्मपाल डोंगरे, डी झेड ठवरे आदींनी परिश्रम घेतले.
