धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा गुन्हा:पिस्तूल दाखवत समाधान खिंडकरला दिली थेट जीवे मारण्याची धमकी, नेमके काय घडले?

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-31t153720975_1780222164.jpg




मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता एक नवीन आणि धक्कादायक वळण आले आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यावरच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांचे सख्खे भाऊ समाधान खिंडकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. समाधान खिंडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असताना तिथे धनंजय देशमुख देखील आले होते. त्याचवेळी धनंजय देशमुख यांनी आपल्या अंगरक्षकाजवळील पिस्तूल काढून घेत समाधान खिंडकर यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. धनंजय देशमुखांवर गुन्हा दाखल या धक्कादायक प्रकारामुळे हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आणि परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर समाधान खिंडकर यांनी दिलेल्या अधिकृत तक्रारीवरून बीड ग्रामीण पोलिसांनी धनंजय देशमुख यांच्यावर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, समाधान खिंडकर जेवणासाठी बसले असताना धनंजय देशमुख यांनी अचानक संताप व्यक्त करत, अंगरक्षकाकडील पिस्तूल हातात घेऊन त्यांना थेट धमकी दिल्याचे म्हटले आहे. या गंभीर घटनेनंतर खिंडकर यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली. धनंजय देशमुख यांच्यावर झालेल्या या नव्या आणि गंभीर आरोपांमुळे, आधीच राज्यभर गाजत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, या प्रकरणात आता आणखी एका गुन्ह्याची भर पडल्याने राजकीय तसेच सामाजिक वर्तुळातही चर्चांना मोठे उधाण आले आहे. मुख्य साक्षीदार दादा खिंडकरला सख्ख्या भावाकडूनच धमकी दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादा खिंडकर यांना धमकावण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, याप्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार, दादा खिंडकर हे त्यांच्या घरी असताना त्यांचा सख्खा लहान भाऊ समाधान खिंडकर तिथे आला. त्यांच्यात जुन्या वादावरून चर्चा सुरू असताना, समाधानने संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्ष देऊ नये आणि हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी धनंजय देशमुख यांना सांगावे, असा दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. दादा खिंडकर यांनी या मागणीला स्पष्ट विरोध केला असता, समाधान खिंडकर याने त्यांना शिवीगाळ करत थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मुख्य हत्या प्रकरणातील साक्षीदारावरच दबाव टाकून त्याला अशा प्रकारे धमकावल्याच्या या नव्या घटनेमुळे, आता या प्रकरणातील साक्षीदारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed