गोकुळ शुगरच्या गणेश शिंदेंसह चौघांवर गुन्हा:चेन्नईच्या कंपनीला 15.72 कोटींना फसवले

0
orig_new-project-2026-05-31t062252817_1780189010.jpg




धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर कारखान्यातून तयार होणारा बी हेवी मॉलेसेस (मळी) आणि सी मॉलासेस चेन्नई येथील इआयडी पॅरी इंडीया लि. कंपनीस देण्याचा करार करण्यात आला. त्यापोटी कारखान्याने १५ कोटी ७२ लाख ५० हजार रुपये घेतले, पण ठरल्यानुसार कंपनीला मॉलेसेस न देता त्यांची फसवणूक केली. इतकेच नव्हे तर आपला साखर कारखाना दिवाळखोरीत असताना ते लपवून करार करुन फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर २०२४ पासून आतापर्यंत घडला. या प्रकरणी गोकुळ शुगरचे गणेश दत्ता शिंदे, विशाल गणपत शिंदे (संचालक), दत्ता बलभीम शिंदे (मॅनेजिंग डायरेक्टर), कपील बलभीम शिंदे (सीएफओ) या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. राजगोपाल श्रीनिवासन रामस्वामी (वय ५१, रा. रामनगर, काचीपुरम, तामिळनाडू) यांनी फिर्याद दिली आहे. गोकुळ शुगर येथे तयार होणारा बी हेवी मॉलेसेस प्रति टन ११ हजार ५०० तर सी मॉलेसेस ९ हजार ५०० रुपये दराने घेण्याचा करार चेन्नई येथील कंपनीशी करण्यात आला. माल वाहतूक करणारे आशिष पारेख यांच्या ओळखीने हा व्यवहार झाला. १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान माल पुरवठा करण्याची हमी ५०० रुपयांच्या बॉन्डवर देण्यात आली. या पोटी चेन्नईच्या कंपनीने १० ऑक्टोबर २०२४ रोजी ९.२० कोटी आणि ५ नोव्हेंबर २०२४ रोजी ६ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये ॲडव्हान्सही दिले. तर सुरक्षा ठेव म्हणून गोकुळ शुगरने सहकारी बँकेचे तीन धनादेश दिले. मात्र नंतर झालेल्या करारानुसार गोकुळ शुगरने मॉलेसेसचा पुरवठा केला नाही. चेन्नईच्या कंपनीने वारंवार फोनवर मागणी केली तरी त्यांना प्रतिसाद दिला नाही. अखेर कंपनीने पोलिसांत तक्रार देण्याचा इशारा दिला, यानंतर कारखान्याने सुधारित वचनपत्र करुन दिले. मात्र नंतरही माल पुरवठा केला नाही. त्यामुळे कंपनीने पोलिसात फिर्याद दिली. त्यावरुन वरील चौघांवर गुन्हा दाखल झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed