हिंगोलीच्या रिसाला बाजार परिसरातील 535 मालमत्ताधारकांना नोटीस:मालकी हक्काचे पुरावे सादर करण्याचे एसडीओ घुटूकडे यांचे आदेश

0
new-project-2026-05-30t213340431_1780157144.jpg




हिंगोली शहरातील रिक्षाला बाजार भागात 535 मालमत्ताधारकांना उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी नोटीस बजावली असून मालकी हक्काचे पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या नोटीसमुळे परिसरातील नागरिकांमधून एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली शहरांमधील अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करून अनेक ठिकाणी अतिक्रमण हटवले आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शहरातील सातबाराची पाहणी केली असता, अनेक ठिकाणी सातबारावर शासनाची मालकी असताना त्या ठिकाणी निवासस्थान व दुकान बांधकाम झाल्याचे आढळून आले आहे. मात्र शासनाची मालमत्ता असताना त्यावर निवासस्थान व दुकान बांधकाम कशाच्या आधारावर झाले यासाठी प्रशासनाने आता नागरिकांकडून मालकी हक्काचे पुरावे तसेच कागदपत्रे घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार काही दिवसापूर्वीच हिंगोली शहरातील 134 जणांना नोटीस बजावून मालकी हक्काचे पुरावे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आज उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी रिसाला बाजार भागातील तब्बल ५३५ मालमत्ताधारकांना नोटीस दिल्या आहेत. यामध्ये काही स्थानिक आजी माजी लोक प्रतिनिधींचा समावेश आहे. या मालमत्ताधारकांना मालकी हक्काचे पुरावे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी ता ११ जून पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान मागील अनेक वर्षापासून या भागात वास्तव्य करणाऱ्या नागरीकांच्या हाती प्रशासनाची नोटीस पडताच नागरीकांमधून एकच खळबळ उडाली आहे. आता या नागरीकांनी मालकी हक्काचे पुरावे शोधण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. ज्या नागरीकांकडे मालकी हक्काचे पुरावे नाहीत त्याचा अहवाल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे सादर केला जाणार असून त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed