सांगली-सातारा विधान परिषदेत मोठा ट्विस्ट:शिंदे सेनेच्या नेत्याचा बंडाचा झेंडा; जोरदार शक्तीप्रदर्शन करत तानाजी पाटलांचा अर्ज दाखल

0
db-temp-cover-marathi-2026-05-30t170622125_1780141071.jpg




राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये अद्याप खलबतं सुरू असतानाच, सांगली-सातारा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्यापूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकवले आहे. या जागेवर भाजपाचा दावा असताना शिंदेंच्या नेत्याने अर्ज भरल्यामुळे महायुतीत बिघाड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तानाजीराव पाटील यांनी सांगली आणि सातारा विधानपरिषद मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी आटपाडी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ही जागा महायुतीत भाजपाच्या वाट्याला जाणे अपेक्षित असताना, पाटील यांनी शिवसेनेच्या वतीने अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणुकीच्या रिंगणात विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तानाजीराव पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मी दिवंगत नेते अनिल बाबर यांच्यासोबत ३०-३२ वर्षे राजकारण आणि समाजकारणात काम केले आहे. या काळात सांगली आणि सातारा जिल्ह्यात जीवाला जीव देणारे मित्र कमावले आहेत. “दोन्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांच्या आग्रहाखातर मी हा निर्णय घेतला आहे. आमदार सुहास बाबर आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या जागेसाठी अधिकृत उमेदवारीची मागणी केली आहे,” असे तानाजीराव पाटील म्हणालेत. ‘सर्वच पक्षांची मदत मिळेल’; विजयाचा विश्वास राजकारणात आपले कोणाशीही शत्रुत्व नसून सर्व पक्षांतील नेत्यांशी मित्रत्वाचे संबंध आहेत, त्यामुळे सर्वच पक्षांचे लोक आपल्याला मदत करतील, असा विश्वास तानाजीराव पाटील यांनी व्यक्त केला. “दहा सूचकांच्या माध्यमातून मी अर्ज भरला असून, तो मागे घेण्यासाठी नाही तर निवडणूक लढवण्यासाठीच भरला आहे,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले. महायुतीसमोर पेच कायम छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या जागांवरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये आधीच वादाचे गुऱ्हाळ सुरू आहे. त्यातच सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनेही किमान तीन जागांची मागणी केली आहे. आता सांगली-साताऱ्यात तानाजीराव पाटील यांनी थेट अर्ज भरल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीचे जागावाटप अद्याप फायनल नसताना झालेल्या या बंडाची चर्चा सध्या राज्यभर रंगली आहे. हे ही वाचा… विधान परिषदेसाठी महायुतीत रस्सीखेच:जळगावात गुलाबराव पाटील मुलासाठी प्रयत्नशील, कोकणात आमदार दळवींच्या मुलीने भरला अर्ज विधान परिषदेच्या 17जागांसाठी पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांत उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. जळगावची जागा भाजपला सुटल्याचे स्पष्ट होताच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आपल्या मुलासाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात तातडीने मुंबईला दाखल झाले. कोकणातील एकमेव जागेवरूनही शिवसेनेतच संघर्ष पेटला आहे. येथे आमदार भरत गोगावले आणि महेंद्र दळवी हे दोन्ही नेते आपापल्या मुलांसाठी तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोलापुरातही भाजपचे शहाजी पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने तेथेही रणकंदन माजण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed