पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूने 16 जणांचा मृत्यू:9 पोलिस, 13 उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी निलंबित

0
8627ba40-1f49-4785-b3b4-3eeb5c7fe696_1780119171133.jpg




पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूच्या दुर्घटनेने खळबळ उडाली आहे. हडपसर आणि फुगेवाडी भागात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून, 4 जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणी प्रशासनाने कठोर पाऊले उचलत 22 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेनंतर पुणे पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ कारवाई केली. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चोबे यांनी अवैध दारू विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या 9 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. पुणे शहरातील हडपसर पोलिस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले, सहायक पोलिस निरीक्षक हसीना शिकलगार आणि गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांना निलंबित करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी पोलिस चौकीशी संबंधित सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे, फौजदार तथा तपास पथक प्रमुख राजू भास्कर, तसेच पोलिस कर्मचारी जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे, सागर जाधव आणि विशाल काळे यांचा समावेश आहे. या गंभीर प्रकरणात केवळ पोलिसच नव्हे, तर राज्य उत्पादन शुल्क विभागातही मोठी कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा आणि अवैध दारू अड्ड्यांवर प्रभावी कारवाई न केल्याच्या आरोपावरून विभागातील 13 जणांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये तीन निरीक्षक, सहा दुय्यम निरीक्षक आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे अवैध दारू विक्री रोखण्यात प्रशासनाच्या अपयशावर प्रकाश टाकला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed