बीकेसीतील 5 एकर जमीन अधिकाऱ्यांच्या घशात?:वरुण सरदेसाईंचा एमएमआरडीएवर गंभीर आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

0
730-x-548-new-2026-05-29t084956429_1780025227.jpg




मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल अर्थात बीकेसी परिसरातील 5 एकर जागेवरून आता मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. बीकेसीच्या मध्यभागी असलेली कोट्यवधी रुपयांची सार्वजनिक जमीन आणि सिटी पार्क हे प्रत्यक्षात एमएमआरडीए अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वापरासाठी खासगी जागेसारखे बनवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही सरदेसाई यांनी केली आहे. वरुण सरदेसाई यांनी आपल्या पत्रात बीकेसीतील सार्वजनिक पार्कमध्ये सामान्य नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. करदात्यांच्या पैशातून उभारण्यात आलेल्या सुविधा जर सामान्य लोकांसाठी उपलब्ध नसतील आणि केवळ काही अधिकाऱ्यांच्या वापरासाठीच ठेवल्या जात असतील, तर तो अत्यंत गंभीर प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक जागेचं बंदिस्त स्वरूपात रूपांतर करून त्याचा वापर मर्यादित लोकांसाठी केला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. निर्णय नेमका कोणी घेतला, याची माहिती सरकारने जनतेसमोर आणावी एमएमआरडीए आयुक्तांनी नेमक्या कोणत्या अधिकाराखाली या पार्कचा प्रवेश पूर्णपणे बंद केला, असा थेट सवालही वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे. करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या सुविधांचा लाभ करदात्यांनाच मिळत नसेल, तर या खर्चाचं औचित्य काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच सार्वजनिक सुविधांचं रूपांतर अधिकाऱ्यांच्या बंदिस्त वसाहतीत करण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला, याची माहिती सरकारने जनतेसमोर आणावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणात पारदर्शक चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *