तिवस्यात काँग्रेसचे इंधन दरवाढ, महागाईविरोधात आंदोलन:मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा उपरोधिक निषेध
![]()
तिवसा येथे काँग्रेस कमिटीने शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात तीव्र आंदोलन केले. केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस सिलिंडर तसेच रासायनिक खतांच्या सतत वाढत असलेल्या दरवाढीचा यावेळी निषेध करण्यात आला. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. केंद्र सरकारने एका महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ केल्याने सर्वसामान्य जनतेचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. वाढत्या महागाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. एलपीजी गॅस सिलिंडरचे वाढते दर, वाढलेला वाहतूक खर्च आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये होत असलेली वाढ यामुळे सामान्य कुटुंबे अडचणीत आली आहेत. सध्या शेती मशागतीचे आणि पेरणीपूर्व हंगामाचे दिवस सुरू आहेत. डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे शेतीचा खर्च प्रचंड वाढला आहे. त्यातच रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांना बॅरेलमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. आंदोलनादरम्यान तिवसा येथील गॅस एजन्सीसमोर लागलेल्या रांगेतील नागरिकांना प्रतीकात्मक स्वरूपात ‘मेलोडी’ चॉकलेट वाटप करून केंद्र सरकारच्या धोरणांचा उपरोधिक निषेध करण्यात आला. ‘महागाईने जनता त्रस्त, सरकार मात्र मस्त’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. यावेळी पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या दरात तात्काळ कपात करावी, रासायनिक खतांच्या दरवाढीवर नियंत्रण आणावे तसेच वाढत्या महागाईवर शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक वैभव वानखडे, बाजार समितीचे सभापती रवी राऊत, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुरेश मेटकर, प्रफुल देशमुख, शहर अध्यक्ष सेतू देशमुख, महिला काँग्रेस अध्यक्ष पूनम काळमेघ यांच्यासह मोहनराव वानखडे, अतुल गवड, रामभाऊ बोकडे, सुनील बाखडे, योगेश वानखडे, राजेंद्र वानखडे, प्रमोद विघ्ने, दीपक पावडे, किसन मुंदाणे, अमर वानखडे, रितेश पांडव, नरेंद्र विघ्ने, गजानन भोंबे, पांडुरंग खेडकर, प्रमोद वानखडे, राजेश देशमुख, जसबीर ठाकूर, सूरज धूमनखेडे, प्रशांत प्रधान, सुनील उतखेडे, दिलीप वानखडे, दिवाकर भुरभुरे, अतुल खुळे, हरिदास भगत, सचिन वानखडे, प्रफुल गंधे, दिनेश वानखडे, वसंत जिरापुरे, सागर राऊत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
