विधान परिषद निवडणुकीसाठी एकही नामांकन नाही:तीन दिवसांत 4 उमेदवारांनी 5 अर्ज उचलले; ईदमुळे आज सुटी
![]()
अमरावती विधान परिषदेच्या अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत एकही नामांकन दाखल झाले नाही. बुधवारी चार उमेदवारांनी एकूण ५ अर्जांची उचल केली. उमेदवारी अर्ज उचलण्याच्या पहिल्या दिवशी (सोमवार) १६, दुसऱ्या दिवशी (मंगळवार) २३ आणि तिसऱ्या दिवशी (बुधवार) ५ असे एकूण ४४ अर्जांची उचल करण्यात आली आहे. गुरुवार, २८ मे रोजी ईदनिमित्त सुटी असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय बंद राहील. जिल्हाधिकारी कार्यालयातील नोंदीनुसार, महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख दावेदारांसाठी सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत अनेक अर्ज नेण्यात आले. बुधवारी दुपारपर्यंत वायएसपीचे नगरसेवक संजय हिंगासपुरे यांनी २ अर्ज घेतले, तर सचिन डोके, अब्दुल नाजीम अब्दुल रऊफ आणि बसपाचे माजी नगरसेवक सुरेश मेश्राम या तिघांनी प्रत्येकी एका अर्जाची उचल केली. यापैकी कोणते उमेदवार कधी अर्ज दाखल करणार, हे येत्या तीन दिवसांत स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून आहे. ईदमुळे गुरुवार आणि साप्ताहिक सुटीमुळे रविवार हे दोन दिवस वगळता आता केवळ तीनच दिवस (२९, ३० मे आणि १ जून) अर्ज दाखल करण्यासाठी उपलब्ध आहेत. राजकीय जाणकारांच्या मते, प्रमुख उमेदवारांचे अर्ज सोमवार, १ जून रोजी म्हणजेच शेवटच्या दिवशीच दाखल होण्याची शक्यता आहे.
